Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना सत्तेसाठी किती लाचारी पत्करणार – देवेंद्र फडणवीस

शिवसेना सत्तेसाठी किती लाचारी पत्करणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई – सावरकरांविरोधात बोलणार्‍यांना उत्तर देताना यापूर्वी शिवसेनेची प्रतिक्रिया जहाल असायची. आता मात्र, त्यांच्या भुमिकेत बदल झाला असून शिवसेनेची प्रतिक्रिया अत्यंत मवाळ होती, शिवसेना सत्तेसाठी किती लाचारी पत्करणार अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेला फडणवीस यांनी डिवचले आहे.

फडणवीस म्हणाले, सत्तेसाठी शिवसेनेला कुठल्या लोकांसोबत तडजोड करावी लागत आहे हे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. सावरकरांचा अपमान महाराष्ट्र आणि देश कधीही सहन करणार नाही. यापूर्वी सावरकरांविरोधातील विधानांवर शिवसेनेची प्रतिक्रिया कशी जहाल आणि जळजळीत असायची आता मात्र, आता आता ती का नरम पडलीय? हा माझ्या समोर प्रश्न आहे. शिवसेनेची प्रतिक्रिया किती मवाळ आहे. यापूर्वीच्या शिवसेनेच्या प्रतिक्रिया आपण बिघतलेल्या आहेत. सत्तेसाठी शिवसेनेच्या भुमिकेत बदल झाला आहे त्यामुळे त्यांना त्यांची सत्ता लखलाभ.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी केलेलं विधान हे अत्यंत लाजिरवाणं आहे. सावकरांबाबत कदाचीत त्यांना माहिती नाही. दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा होणं हे भारताच्या इतिहासात एकाच क्रांतिकारकाबाबत घडलंय आणि ते नाव म्हणजे स्वातंत्रवीर सावरकर. बारा वर्ष अंदमानाच्या काळ्या कोठडीत सावरकरांनी ज्या प्रकारच्या अनन्वित अत्याचारांना सहन केलं आहे ते कदाचित देशाच्या इतिहासात कोणीही केलेलं नसेल, असंही ते म्हणाले.

राहुल गांधी बारा तासही अशाप्रकारे काळ्या कोठडीत राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना सावरकरांबाबत बोलण्याचा अधिकार नाही. केवळ आपल्या नावापुढे कोणी गांधी लावलं म्हणून कोणी गांधी होत नाही. मला वाटतं हे खूपच चुकीच्या पद्धतीचं विधान आहे आम्ही याची निंदा करतो, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

चहापानावर बहिष्कार
आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार टीकास्त्र सोडले आहे. सावरकरांच्या विरोधकांच्या मांडीलामांडी लावून जे बसलेत अशांच्या सरकारच्या चहापाण्याला आपण जाणार नाही, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी सरकार नाकर्ते असल्याची टीका केली. या सरकारचा अजूनही खातेवाटप झालेला नाही, राज्याला मंत्रीच नाहीत त्यामुळे आम्ही जनतेचे प्रश्न कुणापुढे मांडणार असा सवाल करत, हे सरकार शेतकर्‍यांबाबत अजून एकही शब्द बोललेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. या सरकारमध्ये मंत्रीच नाहीत. आधी निर्णय घ्या, मग चर्चेला बोलवा असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या