Friday, April 26, 2024
Homeनगरदेसवंडीत मुळा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा

देसवंडीत मुळा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील मुळा नदीपात्रातून होणारा वाळू उपसा त्वरीत बंद करून तहसीलदार फसियोद्दीन शेख तसेच पीआय देशमुख यांनी या वाळू तस्करांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देसवंडी येथील ग्रामस्थ व शेतकर्‍यांकडून होत आहे.

देसवंडी मुळा नदीपात्रातील बेसुमार वाळू उपशामुळे हमखास पाणी असणार्‍या विहिरी, कुपनलिका कोरड्या पडून मागील काही वर्षात येथील हमखास बागायती असलेली शेती धोक्यात आली होती. त्यानंतर ग्रामसभेची बैठक होऊन गावातून वाळू वाहतूक होऊ न देण्याची व ज्यांना स्वतःच्या कामासाठी गावातील बांधकामासाठी वाळू लागेल, त्यांनी बैलगाडीतूनच वाळू कामापुरती आणावी, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. दि. 13 ऑगस्टला याबाबत ग्रामसभेत ठराव होऊन त्याची सूचना शंकर कल्हापुरे यांनी मांडली. त्यास सदस्य सागर कल्हापुरे यांनी अनुमोदन दिले होते. याबाबत तहसीलदार राहुरी यांनाही कळविले होते.

- Advertisement -

मात्र, सध्या गावातील काही वाळू तस्करांनी जवळपास 25 बैलगाड्यांद्वारे नदीपात्रातून वाळू उपसा बेसुमारपणे सुरू ठेवला असून ही वाळू रात्री टेम्पो, डंपरमध्ये भरून दिली जाते. यातून हे वाळूतस्कर लाखो रुपये कमविताना शासनाची मात्र, फसवणूक करीत आहेत. काही कालावधीनंतर यास आळा बसावा, म्हणून ग्रामपंचायतीकडून नदीकडे स्मशानभूमीमार्गे जाणार्‍या रस्त्याला गेट बसविले होते. मात्र, हे गेटही या वाळू तस्करांनी उखडून फेकून देऊन याबाबत अरेरावी करून जो कोणी आडवा येईल, त्याला धमकी देण्यात आली होती.

वाळूतस्करांच्या दादागिरीमुळे सर्वसामान्य ग्रामस्थ मुकाटपणे हे उजाड होणारे भविष्य पाहत आहेत. वाळू तस्करांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सागर कल्हापुरे, अरुण कल्हापुरे, अण्णासाहेब शिरसाठ, सुभाष शिरसाठ, मच्छिंद्र शिरसाठ, अरुण गागरे, आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या