नितीशकुमार यांची तिरकी चाल
Featured

नितीशकुमार यांची तिरकी चाल

Balvant Gaikwad

राज्यरंग –  शिवशरण यादव

भाजपच्या मित्रपक्षांमध्ये दरी निर्माण झाली आहे. भाजपची देशपातळीवर होत असलेली पीछेहाट पाहून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले मित्रपक्ष भाजपची कोंडी करायला लागले आहेत. भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने आता भाजपवर दबाव आणून विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे ठरवले आहे. नितीशकुमार यांच्या या तिरक्या चालीच्या निमित्ताने…

यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी आतापासून व्यूहरचना आणि दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा पवित्रा संयुक्त जनता दलाने घेतला आहे. असे असले तरी संयुक्त जनता दलातही एकवाक्यता नाही. पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि काही जुन्या नेत्यांमध्ये मतभेदाची दरी निर्माण झाली आहे. पाच वर्षांपूर्वी अचानक संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलाने एकत्र येऊन बिहारची सत्ता मिळवली होती. तिहेरी तलाक, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, काश्मीर, नागरिकत्व कायद्याबाबत संयुक्त जनता दलाने भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. आता तर प्रशांत किशोर यांनी भाजपचे विरोधक असलेल्या अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची निवडणूकविषयक कामे घेतली आहेत. नितीशकुमार यांचे काही सहकारी प्रशांत किशोर यांच्यावर नाराज असले तरी नितीशकुमार मात्र प्रशांत किशोर यांना पाठीशी  घालत आहेत.

नितीशकुमार हे २००५ पासून मुख्यमंत्री आहेत. मध्यंतरीचा जीतनराम मांझी यांचाच काय तो अपवाद. सुशीलकुमार मोदी हेही नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दुसर्‍यांदा उपमुख्यमंत्री आहेत. प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकत्व कायद्याविरोधात केलेल्या टीकेमुळे सुशीलकुमार नाराज आहेत. आघाडीच्या सरकारमध्ये राहून आघाडी धर्माविरोधात एखादा नेता कसा भाष्य करू शकतो, असा त्यांचा सवाल आहे. प्रशांत किशोर यांना मात्र त्यात वावगे काही वाटत नाही. नितीशकुमार यांनी मात्र कोणत्याही वादात पडायचे नाही, असे ठरवलेले दिसते. मात्र

नितीशकुमार यांचा आशीर्वाद असल्याशिवाय प्रशांत किशोर भाजपवर टीका करणार नाहीत, असे सांगितले जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीसाठीची व्यूहरचना म्हणूनही प्रशांत किशोर यांच्या टीकेकडे पाहिले जाते. कॉंग्रेसने तर थेट नितीशकुमार यांनाच आव्हान दिले आहे. भाजपबरोबर राहायचे की महागठबंधनसोबत यायचेे, हे नितीशकुमार यांनी ठरवावे, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. प्रदीर्घ काळ भाजप आणि संयुक्त जनता दलाने परस्परांवर टीका केल्यानंतर अलीकडे मात्र नितीशकुमार यांनी युतीत सारे काही ठीक असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी ५० टक्के जागा लढवणार आहे, परंतु प्रशांत किशोर यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपपेक्षा संयुक्त जनता दलाला पाचपट जास्त जागा मिळायला हव्यात, अशी मागणी केली आहे. जागावाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. प्रशांत किशोर यांना जागावाटपाबाबत भाष्य करण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल भाजपचे नेते करत आहेत. अमित शहा यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभेची निवडणूक लढवली जाईल असे सांगितले असले तरी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी मात्र बिहार विधानसभेची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे जाहीर केल्याने भाजपमध्येही अंतर्गत वाद असल्याचे समोर आले आहे.

आता संयुक्त जनता दल आणि भाजपमधल्या मतभेदांची दरी कमी व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुढाकार घेण्याची शक्यता आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार दुसर्‍यांदा केंद्रात आले तेव्हा संयुक्त जनता दलाने लोकसभेत मिळालेल्या जागांच्या आधारावर केंद्रात दोन मंत्रिपदांची मागणी केली होती, परंतु त्यावेळी पंतप्रधानांनी संयुक्त जनता दलाची एकाच मंत्रिपदावर बोळवण करायचे ठरवले होते. नितीशकुमार यांनी एकच मंत्रिपद स्वीकारायला नकार दिला होता. भारतीय जनता पक्षाची देशपातळीवर होत असलेली पीछेहाट लक्षात घेऊन किमान बिहारसारख्या मोठ्या राज्यातल्या सत्तेत तरी पायउतार होण्याची वेळ येऊ नये म्हणून भाजपतर्ङ्गे वादावर पडदा टाकून दोन्ही पक्षांची मैत्री घट्ट करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यासाठी या पक्षाच्या दोन सदस्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेण्याची तयारी मोदी यांनी दाखवली आहे. राजीव रंजन सिंग आणि रामचंद्र प्रसाद यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांमधला विसंवाद आणि मतभेदाची दरी कमी करायची असेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार हाच उपाय आहे. नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल एकदा केंद्र सरकारमध्ये सहभागी झाला तर दोन्ही पक्षांमधल्या युतीचा विधानसभेच्या निवडणुकीतला मार्ग मोकळा होईल.

Deshdoot
www.deshdoot.com