लाचेची मागणी करणार्‍या दोन पोलिसांवर गुन्हा दाखल
Featured

लाचेची मागणी करणार्‍या दोन पोलिसांवर गुन्हा दाखल

Sarvmat Digital

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करू नये व मदत करण्याच्या मोबदल्यात शिर्डी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर व विशाल पी. मैद या दोघाना चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी पुणतांबा फाटा पंचासमक्ष केल्याने नगर येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव, शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील रहिवाशी सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता, कोपरगाव या ठिकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी विक्रीचे दुकान असून कोपरगाव बागुल वस्ती येथील बंडू जगताप नावाच्या एका युवकाने त्यांच्याकडून मे 2018 रोजी एक बजाज पल्सर कंपनीची दुचाकी खरेदी केली होती.त्याने ती संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील बाजारात अज्ञात इसमास अदलाबदल करून विकली. शिर्डीत एका परप्रांतीय महिलेची पर्स ओढताना काही चोरटे पकडण्यात आले होते.

त्यात ही प्लसर गाडी सापडल्याने शिर्डी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांनी दुचाकी दलाल सागर सय्यद व त्यांचा भाऊ मोहसीन सय्यद यांचेकडील असल्याचा बहाणा करून सागर सय्यद त्याचा भाऊ मोहसीन सय्यद व त्यांच्याकडे काम करणारा राहुल काकडे यांची नावे वगळण्यासाठी पन्नास हजारांची मागणी केली. त्यात तडजोड होऊन ती रक्कम चाळीस हजार रुपये करण्यात आली. ही रक्कम जास्त व अन्यायकारक वाटल्याने या दोघांनी याबाबत अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून न्याय मागितला होता.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोपरगाव नजीक असलेल्या पुणतांबा चौफुलीवर शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर रोजी साडेचारच्या दरम्यान सापळा लावला होता. त्यात फिर्यादी सागर सय्यद व त्याचा भाऊ मोहसीन सय्यद व त्यांच्याकडे काम करणारा मुलगा राहुल काकडे यांना अटक न करण्याच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपये देण्याची चर्चा तेथे असलेल्या पंचासमक्ष चालू असताना आरोपी पोलीस शिपाई सुपेकर व मैद यांना संशय आल्याने त्यांनी पोबारा केला होता.

दरम्यान या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी एच. डी. खेडकर यांनी समक्ष भेट देऊन पाहणी करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे आरोपी ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक करांडे हे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com