दाळीला भाववाढीचा तडका

दाळीला भाववाढीचा तडका

शंभरी गाठली । गृहिणींचे बजेट कोलमडलं

अहमदनगर – कांदा भावाने रडकुंडी आणल्यानंतर आता नगरकर गृहीणीचे बजेट दाळीच्या भावाने कोलमडले आहे. दाळीच्या भावात तब्बल वीस रुपयांची भाववाढ होत शंभरी गाठली आहे.

ऐन लग्नसराईत दाळी आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य नागरिक परेशान झाले आहेत. दाळीच्या भाववाढीमुळे ग्रामीण भागासह शहरातील कुटुंबात रात्रीच्या जेवणात खिचडी हा आवडता मेन्यू आता कमी होत असल्याचे चित्र आहे. भाववाढीमुळे रोजच्या जेवणातून कांदा हद्दपार झाला आहेच आता खिचडीतून तूरडाळ देखील हद्दपार होताना दिसत आहे. नगरच्या मार्केटमध्ये दाळीच्या आवक घटल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले. लातूर, नांदेड, परभणी, औरंगाबादेतून नगरच्या मार्केटध्ये दाळीची आवक होते.

पण या वर्षी विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात आवकाळी पाऊस झाल्याने दाळ पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी उत्पादनात घट झाल्याने किंमती वाढल्याचे सांगण्यात आले. बहुतांश सगळ्याच प्रकारच्या दाळीच्या भावांनी शंभरी गाठली आहे. त्यात आणकी भाववाढ होईल असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

शेतकर्‍यांची नवीन तूर आणि हरबरा बाजारात विक्रीला येण्याला एक ते दीड महिने बाकी आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी त्याच्याकडील साठवलेल्या दाळीचा तुटवडा निर्माण केला असून ही कृत्रिम टंचाई असल्याचे जाणकार सांगतात.

खरेदीचा हात आखडता
नगर शहरात परराज्यातून दाळ येते. दाळ वाहतुकीचा खर्च, डिझेल भाववाढीने नगरात भाव भडकल्याचे सांगण्यात आले. स्वस्त धान्य दुकानातून मिळणारी दाळ गायब झाल्याने दुकानातून खरेदीशिवाय पर्याय नाही. भाववाढ पाहता दाळ खरेदीत हात आखडता घेत असल्याचे चित्र दिसून येते. परिेणामी रोजच्या जेवणातून दिसणारी खिचडी आता कधीतरी दिसत आहे. शेतकर्‍यांनाही दुकानातूनच दाळ खरेदी करावी लागत असल्याने त्यांचेही बजेट कोलमडले आहे.

दाळीचे भाव (प्रतिकिलो)
तूर दाळ : 90 ते 100
मूग दाळ : 90 ते 100
चवळी : 65 ते 70
हरभरा दाळ : 60 ते 65
मसूर दाळ : 75 ते 85
उडीद दाळ : 95 ते 105

यंदा अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दाळीचे भाव दहा ते वीस रूपयांनी वाढले आहे. काही दिवस भाव चढे राहण्याची शक्यता आहे. लग्नसराईमुळे दाळीना अधिक मागणी आहे. शेतकर्‍यांचा नवीन हरभरा आणि तूर मार्केटमध्ये आल्यानंतर भाव उतरतील.
– झुंबरलाल गांधी, भुसार मालाचे व्यापारी, अ. नगर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com