Featured

जळगाव : करोना संशयित मृताच्या अंत्ययात्रेत नातेवाईकांची गर्दी

Balvant Gaikwad

शहरातील एका भागामधील कोरोना संशयित रुग्णाचा रविवारी दुपारी जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या अंत्ययात्रेत नातेवाईक, परिचित मंडळी, समाजबांधवांची मोठ्या संख्येने गर्दी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच नातेवाईक, परिचित मंडळीच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतु, या आदेशाचे उल्लंघन झाले आहे.

या रुग्णास जिल्हा कोविड रुग्णालयात दुपारी दाखल करण्यात आले होते. मात्र, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्याचे डॉक्टरांनी कोरोना संशयित रुग्ण म्हणून स्वॅब घेतले आहे. या रुग्णाचा मृत्यू पश्चात अहवाल निगेटिव्ह आल्यास दिलासा मिळेल.

पण, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या संपर्कातील, अंत्यविधीत सहभागी झालेल्या हायरिस्कमधील व्यक्तींना धोका संभवू शकतो. त्यामुळे अशा अंत्ययात्रेत नागरिकांनी गर्दी करता कामा नये, अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. परंतु, अशा वेळी नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसते.

कारवाईचे संकेत

या अंत्ययात्रेतील गर्दीबाबत काही नागरिकांनी पोलिसांना देखील फोन केले. त्यामुळे पोलिसांनी त्या स्मशानभूमीत तत्काळ जावून फोटो काढले, तर व्हीडीओ शुटींगही केली आहे. यासंदर्भात पोलीस माहिती घेत आहेत. गर्दी करुन शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com