जळके शिवारात आढळलेल्या मृत महिलेचा घातपातच
Featured

जळके शिवारात आढळलेल्या मृत महिलेचा घातपातच

Sarvmat Digital

गळा आवळून खून; गंगापूर व नेवाशाच्या चौघा आरोपींना अटक प्रेमसंबंधांतून एका खुनाची माहिती झाल्याने ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार

नेवासा (शहर प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील जळके शिवारात शनिवारी आढळलेल्या अज्ञात महिलेच्या घातपाताचा संशय असलेल्या मृतदेहाप्रकरणी शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूरच्या सायबर गुन्हे विभागाने चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी दोघे गंगापूर तालुक्यातील तर दोघे नेवासा तालुक्यातील आहेत. मयत महिलेचे नाव मंगल सोमनाथ दुसिंग असे आहे.

याबाबत माहिती अशी की नेवासा तालुक्यातील जळके खुर्द शिवारात पाटाच्या कडेला राजेंद्र जानकू सोनकांबळे यांच्या शेतालगत एका अंदाजे 35 वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलीस पाटील नारायण शिंदे यांच्या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. या महिलेचा घातपात झाल्याचा संशय होता. तिच्या शवविच्छेदन अहवालानंतरच त्याबाबत स्पष्ट होणार होते. नगरच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडून आलेल्या शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पोलीस हवालदार के. आर. साळवे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा रजिस्टर फर्स्ट 748/2019 भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्यासह घटनास्थळी पाहणी करून तपासासाठी नेवासा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तयार केले.

सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस नाईक श्री. यादव यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन तसेच श्रीरामपूरच्या सायबर सेलच्या मदतीचे गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करुन आरोपी अमिन रज्जाक पठाण (वय 35) रा. बोलठाण ता. गंगापूर जि. औरंगाबाद यास ताब्यात घेतले. त्यास गुन्ह्याबात विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या इतर साथीदारंची नावे रतन छबुराव थोरात (वय 28) रा. तांदूळवाडी ता. गंगापूर, सोनाली सुखदेव थोरात (वय 22) रा. तांदूळवाडी ता. गंगापूर हल्ली रा. गिडेगाव ता. नेवासा व राजू भाऊसाहेब उघाडे (वय 50) रा. गिडेगाव ता. नेवासा असे असल्याचे सांगितले.

यातील आरोपींची विचारपूस करता आरोपी क्र. 1 याचे आरोपी क्र. 4 हिच्याशी प्रेमसंबंध होते. तसेच अटक आरोपी क्र. 1, 2 व 3 यांनी 11 नोव्हेंबर 2018 रोजी यातील आरोपी सोनाली थोरात हिचा पती सुखदेव थोरात याला प्रेमसंबंधाबाबत माहिती झाल्याने त्यास जीवे ठार मारले.

सुखदेव थोरात यास मारल्याबाबत यातील मृत मंगल सोमनाथ दुसिंग हिला माहिती झाल्याने ती यातील आरोपी अमिन पठाण यास ब्लॅकमेल करुन पैसे मागत असे तिच्या पैशाच्या मागणीला कंटाळून तिला वरील आरोपींनी त्यांच्या अन्य एका फरार साथीदारासह तिला जोगेश्‍वरी-वाळुंज रस्त्यावर गळा आवळून तोंड दाबून जीवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जळके खुर्द शिवारात आणून टाकले.

सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्यासह हवालदार विठ्ठल गायकवाड, जयसिंग आव्हाड, कैलास साळवे, यादव कुदळे आदी पुढील तपास करत आहेत.

अटकेतील चौघे आरोपी
राजू भाऊसाहेब उघाडे (वय 50) गिडेगाव ता. नेवासा
सोनाली सुखदेव थोरात (वय 22) गिडेगाव ता. नेवासा
रतन छबुराव थोरात (वय 28) तांदूळवाडी ता. गंगापूर
अमिन रज्जाक पठाण (वय 35) बोलठाण ता. गंगापूर

Deshdoot
www.deshdoot.com