Thursday, April 25, 2024
Homeनगरसोनई तिहेरी हत्याकांड; चौघांची फाशी कायम

सोनई तिहेरी हत्याकांड; चौघांची फाशी कायम

प्रेमसंबंधाच्या रागातून झाली होती हत्या

गणेशवाडी (वार्ताहर)- 2013 वर्षाच्या पहिल्याच दिवशी नेवासा तालुक्यातील सोनईनजीकच्या गणेशवाडी येथील तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडवून दिल्याच्या प्रकरणातील 5 दोषींना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानेही कायम केली आहे. शिक्षा सुनावलेल्या पाचपैकी एकाचा गेल्या वर्षी मृत्यू झाल्याने चौघांना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल. गाजलेल्या या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली होती.

- Advertisement -

1 जानेवारी 2013 रोजी नेवासा तालुक्यातील सोनईजवळील गणेशवाडी येथे तिहेरी हत्याकांड घडले होते. प्रेमप्रकरणाच्या विरोधातून हे हत्याकांड झाले होते. सचिन घारू व त्याचे मित्र संदीप राज धनवार व राहुल कंडारे या तिघांचे हत्याकांड घडले होते. या प्रकरणाचा 18 जानेवारी 2018 रोजी नाशिकच्या सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला होता. यात एकूण 6 जणांना दोषी ठरवण्यात आले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने सहापैकी पाच आरोपींची फाशीची कायम ठेवली आहे. आरोपींपैकी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले याचा नाशिकच्या कारागृहात 23 जून 2018 रोजी हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे. रमेश विश्वनाथ दरंदले (39), प्रकाश विश्वनाथ दरंदले (34), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (55), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (19) सर्व रा. गणेशवाडी (विठ्ठलवाडी) तालुका नेवासा आणि संदीप माधव कुर्‍हे (33) रा. खरवंडी, ता. नेवासा अशी या पाच आरोपींची नावे आहेत. निकालपत्रात न्यायालयाने आरोपींवर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. अशोक रोहिदास फलके रा. लांडेवाडी यास दोषमुक्त केले होते.

अशी केली होती तिघांची हत्या
संदीप राजू धनवार, राहुल कंडारे, सचिन घारू हे तिघे तरुण नेवासाफाटा येथे कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. संदीप धनवार यास सेफ्टीटँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणार्‍या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. धनवार व कंडारे यांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आले तर घारू याचे मुंडके व अडकित्त्याने तोडलेले हातपाय एका कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते. 

आरोपींनी निर्दयपणे व थंड डोक्याने परंतु अतिशय नियोजनबद्धपणे हे हत्याकांड केले. प्रारंभी संदीप राजू धनवार याला पकडण्यात आले. संदीप हा शरीरयष्टीने धडधाकड असल्याने त्याला संपविणे सोपे नसल्याचे पाहून सर्व आरोपींनी एकत्र येत संदीपला ज्या सेफ्टी टँकमध्ये तो काम करीत होता त्याच टँकच्या पाण्यामध्ये त्याचे डोके खाली व पाय वर करून पाण्यात बुडवून ठार मारले. हा प्रकार पाहून राहूल उर्फ तिलक राजू कंडारे हा जीवाच्या भीतीने शेतातून जिकडे वाट मिळेल तिकडे पळत असताना त्याचा पाठलाग करण्यात आला व ऊस तोडीच्या कोयत्याने डोक्याच्या मागील बाजूस वार करून जखमी केले. वर्मी घाव बसलेल्या राहूल कंडारे याने अवघ्या काही क्षणातच प्राण सोडला. संदीप व राहुल यांच्यापेक्षा आरोपींच्या मनात सचिन धारू याच्या विषयी अधिक राग होता त्यामुळे सचिनने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याचाही पाठलाग करून पकडण्यात आले. ज्या ठिकाणी सचिनला पकडले त्या ठिकाणाजवळील शेत गट नंबर 298/2 मधील शेतातील खड्ड्यात नेवून वैरण कापण्याच्या आडकित्यामध्ये सचिनला जिवंत टाकून प्रथम त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून व दोन्ही हात खांद्यापासून कापून वेगळे केले. नंतर जिवंतपणे त्याची मान आडकित्त्यामध्ये घालून ती धडापासून वेगळी करून क्रूरपणे त्यास ठार मारले.

- Advertisment -

ताज्या बातम्या