अर्धवट जळालेल्या मृतदेहाची कुत्र्यांकडून विटंबना
Featured

अर्धवट जळालेल्या मृतदेहाची कुत्र्यांकडून विटंबना

Sarvmat Digital

नवग्रह मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले विधिपूर्वक अंत्यसंस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) – अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चित्तेतून बाहेर काढत लांबवर ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत सोमवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. परिसरातील काही तरुणांनी या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा दहनविधी केला. महापालिकेनेही याची गंभीर दखल घेत अमरधाम येथे सुरक्षा कर्मचारी वाढविण्यापासून इतर महत्त्वाचे निर्णय घेतले.

अमरधाम स्मशानभूमीत रविवारी (दि. 1) दिवसभरात सुमारे 13 ते 14 अंत्यविधी झाले. दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी ओट्याच्या खाली करण्यात आले होते. रात्री उशीराही एक अंत्यविधी ओट्याच्या खालीच करण्यात आला होता. सकाळी काही नागरिक दशक्रिया विधीनिमित्त अमरधाममध्ये आले असता त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्रे ओढत नेत असल्याचे दिसून आले. हे पाहून नागरिकांत खळबळ उडाली. अनेकांनी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच नगरसेवकांना फोन करून याबाबतची माहिती दिली. काहींनी पोलिसांनाही कळविले.

याबाबतची माहिती समजताच नवग्रह मित्रमंडळाचे अमोल बनकर व कार्यकर्ते त्याठिकाणी आले. अर्धवट जळालेला मृतदेह भटक्या कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बनकर व त्यांच्या सहकार्‍यांनी सदर अर्धवट जळालेला मृतदेह पुन्हा चितेवर नेवून विधिवत दहनविधी केला. या घटनेमुळे अमरधाममधील सुविधा व सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एखाद्या मृतदेहाची विटंबना संतापजनक बाब असून अमरधाम स्मशानभूमीची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळलेली असल्याने मोकाट कुत्रे व जनावरांचा याठिकाणी नेहमीच वावर असतो. त्यातूनच अशा घटना होत असतात. याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी अजय चितळे यांनी केली.

तर स्वेच्छानिवृत्ती मंजूर करा
यावेळी अमरधाम स्मशानभूमीच्या परिसरात पुन्हा मोकाट जनावरे, भटके कुत्रे दिसल्यास तेथे नियुक्त कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौर वाकळे यांनी दिल्या. उद्यान व विद्युत विभागाचे अनेक कर्मचारी सांगितलेली कामे करत नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौरांनी ज्यांना कामे करायची नाहीत व स्वेच्छानिवृत्ती घ्यायची आहे, अशा कर्मचार्‍यांचे स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज तातडीने मंजूर करण्याच्याही सूचना दिल्या.

विद्युतदाहिनी तातडीने सुरू करणार : महापौर वाकळे
अमरधाममधील मृतदेहाच्या विटंबनेचा प्रकार समजताच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अमरधाममध्ये जाऊन पाहणी केली. तसेच दुपारी तातडीने विद्युत, आरोग्य व उद्यान विभागाची बैठक घेतली. या बैठकीत अमरधाममध्ये करावयाच्या आवश्यक सोयी-सुविधांबाबत मंजूर असलेली 40 लाखांची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच अमरधाममधील बंद असलेली विद्युत दाहिनी तातडीने सुरू केली जाईल. या विद्युतदाहिनीसाठी पूर्वी एक हजार 200 रुपये शुल्क आकारले जात होते. ते आता 900 रुपये आकारण्यात येईल. तसेच मुलतानचंद बोरा ट्रस्टमार्फत आणखी एक विद्युतदाहिनी बसविली जाणार असून तीही लवकरच कार्यान्वित होईल, असेही महापौर वाकळे म्हणाले. बैठकीस उपमहापौर मालनताई ढोणे, उपायुक्त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, उद्यान विभागाचे शशिकांत नजान, विद्युत विभागाचे पी. एल. शेंडगे, अजय चितळे, संजय ढोणे यांच्यासह मुलतानचंद बोरा ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com