छिंदमचे नगरसेवकपद अखेर रद्द
Featured

छिंदमचे नगरसेवकपद अखेर रद्द

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अत्यंत अवमानकारक वक्तव्य करणारे नगर महापालिकेचे तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या आदेशाची प्रत महापालिकेला प्राप्त झाली असून, सध्या अपक्ष म्हणून नगरसेवक असलेल्या छिंदम याचे पद आता संपुष्टात आले आहे.

छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत 16 फेब्रुवारी 2018 रोजी अवमानकारक वक्तव्य केले. त्यावेळी तो भाजपच्या चिन्हावर महापालिकेत निवडून आला होता आणि उपमहापौर पदावर होता. भाजपमधील दोन गटाच्या वादात त्याला उपमहापौर पदाची लॉटरी लागली होती. प्रभागात स्वच्छतेसाठी कामगार पाठविण्यासाठी त्याने महापालिका कर्मचार्‍याला केलेल्या फोनवर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याचे हे वक्तव्य त्यावेळी सोशल मिडीयावर लगेच व्हायरल झाले. त्यानंतर उभ्या महाराष्ट्रात संताप व्यक्त होत होता. नगरमध्ये तर शिवप्रेमींनी त्याच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले होते.

शिवप्रेमींचा संताप लक्षात घेऊन नगर महापालिकेने 26 फेब्रुवारी 2018 रोजी विशेष सभा घेऊन त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव एकमताने ेमंजूर केला होता. हा ठराव महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी 9 मार्च 2018 रोजी सादर केला होता. नियमानुसार संबंधिताला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देणे आवश्यक असते. सरकारने याबाबत अहवाल मागवून घेतला. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 13 (1) (अ) मधील तरतुदींनुसार छिंदमला नोटिस बजावण्यात येऊन बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. नगरविकास खात्याच्या तत्कालीन राज्यमंत्र्यांकडे यावर सुनावणी झाली. 17 ऑक्टोबर 2018, 5 ऑगस्ट 2019 आणि 22 ऑगस्ट 2019 रोजी या सुनावण्या झाल्या.

दरम्यान महापालिकेची सार्वजनिक निवडणूक झाली. या निवडणुकीतही छिंदम अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरला आणि निवडूनही आला. राज्यातील सरकार बदलल्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुरुवारी (दि. 27) अंतिम सुनावणी झाली. या सुनावणीला छिंदम अनुपस्थित राहिला. प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहाण्यास नकार दर्शवत छिंदमने यापूर्वी सादर केलेले म्हणणे ग्राह्य धरण्याची विनंती केली होती. महापालिकेकडून या सुनावणीस उपायुक्त प्रदीप पठारे आणि प्रभारी नगरसचिव एस. बी. तडवी उपस्थित होते. मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचा ठराव, आयुक्तांनी वेळोवेळी सादर केलेले अहवाल आणि आजवर अवलंब केलेल्या प्रक्रियेचा विचार करून छिंदम यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले.

गुरूवारी सुनावणी झाल्यानंतर लगेच सायंकाळनंतर छिंदम याचे नगरसेवक पद रद्द झाल्याचे सोशल मीडियातून व्हायरल झाले. मात्र गुरूवारी या संदर्भातील आदेश निघालेला नव्हता. शुक्रवारी दुपारी या संदर्भातील आदेश निघाला असून, त्यात सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर नगरसेवक पद रद्द करण्याच्या कारवाईस छिंदम पात्र असल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच त्याचे विद्यमान नगरसेवकपद रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट उल्लेख आदेशात असल्याने त्याचे नगरसेवकपद आता रद्द झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com