पुणे : कोरोनाग्रस्ताचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात न देण्याचे आदेश
Featured

पुणे : कोरोनाग्रस्ताचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात न देण्याचे आदेश

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

पुण्यात आज दोन कोरोना बाधितांचा मृत्यू, मृतांचा आकडा 33 वर
पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात आज दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एक पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. पुण्यामध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 33 वर पोहचला आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांचा रुग्णाचे निधन झाल्यास त्याचा मृतदेह कुटुंबीयांना दिला जाणार नाही, असा मोठा निर्णय पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी घेतला आहे. पुणे विभागासाठी हा निर्णय डॉ. म्हैसेकर यांनी घेतला आहे. त्या मृतदेहावर गॅस किंवा विद्युतदाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येतील.
आधीपासूनच कोरोनाबाधिताच्या मृतदेहावर गॅस किंवा विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची स्पष्ट सूचना होती. परंतु रुग्णाच्या मोजक्या कुटुंबियांना यामध्ये सहभागी होण्याची मुभा होती. आता कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात न देण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
मृतदेह दफन करायचा असल्यास शहरापासून दूर अंतरावर सहा फूट खोल खड्डा खणावा लागेल. त्यामध्ये निर्जंतुक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये ठेवून दफन केला जाईल.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात होणार्‍या मृत्यूंची संख्या वाढली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त दगावले आहेत. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील सर्व जिल्हाप्रमुखांना कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराविषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनाबाधित मृत व्यक्तीमुळे विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची मोठी शक्यता असते. कोरोनाबाधित मृतदेह हाताळणी करणार्‍या कर्मचार्‍यांना पीपीई किट, सॅनिटायझर अशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचनाही म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी ऑनलाईन सेवा देणार्‍या कंपन्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी ऑनलाईन कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ऑनलाईन सेवा देताना फक्त जीवनावश्यक वस्तू, अन्न, फळे, भाजीपाला यांचाच अंतर्भाव असावा, असं दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं.

दीपक म्हैसेकर म्हणाले, ऑनलाईन कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करावा. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना फक्त वस्तू, अन्न, फळे, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूच घरपोच कराव्यात. ज्या संस्थांकडे औषध सेवा पोहच करण्याचा परवाना असेल त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे देण्याची व्यवस्था करावी.
होम डिलिव्हरी सेवा देणार्‍या डिलिव्हरी बॉयला जे पास दिले आहेत त्याचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी संबंधितांनी घ्यावी. ज्या क्षेत्रासाठी पास असेल त्या क्षेत्राबाहेर सेवा देऊ नयेत. डिलिव्हरीसाठी वाहनांची संख्याही मर्यादित ठेवावी. सिल केलेला भाग अथवा कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सेवा देऊ नयेत. त्याचप्रमाणे सिल केलेल्या भागात राहणार्‍या डिलिव्हरी बॉयला डिलिव्हरीसाठी परवानगी दिली जाणार नाही, असंही दीपक म्हैसेकर यांनी नमूद केलं.

Deshdoot
www.deshdoot.com