पुण्यात कोरोना बळींचा आकडा २६ वर

jalgaon-digital
2 Min Read

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना बळींचा आकडा २६ वर पोहोचला आहे.
पुण्यात ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती मूळ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित बळींचा आकडा हा २६ झाला आहे.
पुणे महानगर पालिका क्षेत्रात आतापर्यंत २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पुणे ग्रामीण भागात एकाचा मृत्यू झाला आहे. पुणे ग्रामीण भागात मृत्यू झालेला हा रुग्ण मूळचा बारामतीतील आहे.

शहरात एकीकडे कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशात आज कोरोनासबंधी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शहरातील ५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. हे पाचही कोरोनाबाधित रुग्ण एकाच कुटुंबातील असून १४ दिवसांच्या उपचारानंतर त्यांचे दोन्ही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या पाचही जणांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.दरम्यान, शहरात १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ जणांचा महापालीकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात, तर ४ जणांचा ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९० एवढी झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ एवढी झाली आहे. शहरात एकूण २३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

दरम्यान, “मनपाच्या कोरोना नियोजनाची दखल ‘स्मार्ट सिटी गव्हर्ननन्स’ने घेतली आहे. देशातील चार मुख्य शहरांपैकी पुण्याचं नियोजन अग्रक्रम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मनपा प्रशासन, कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुण्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. काही झोपडपट्टीतला आकडा वाढल्यावर निवडक भाग सील करणार आहोत. पुण्यात १८६ रुग्ण ऍडमिट असून त्यापैकी सहा जणांची परिस्थिती गंभीर आहे. मात्र, एक आठवड्यात मृत्यूचं प्रमाण कमी होईल”, असं शेखर गायकवाड म्हणाले.

“कोरोना संदर्भात तीन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी फक्त ताप, सर्दी, खोकला अशी या केंद्रावर तपासणी होते, दुसऱ्या नायडूसारख्या ठिकाणी व्हेंटिलेटर, डॉक्टर आणि शंभर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, तिसऱ्या टप्प्यात फार क्रिटीकल अशा ससून आणि सिम्बायोसिस रुग्णालय आणि खासगी बेड उपलब्ध आहेत. चार पाच महत्त्वाच्या भागात मृतांचा आकडा पाचवर गेल्यानंतर मर्यादित स्वरुपात कर्फ्यू लागू करु”, असेही त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *