Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे-मुंबईचा लॉकडाऊन जूनपर्यंत

पुणे-मुंबईचा लॉकडाऊन जूनपर्यंत

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने वाढवलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत असला तरी पुणे आणि मुंबईला दिलासा मिळण्याची शक्यता खूप कमीच आहे. पुणे आणि मुंबई शहरात नवीन कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या सारखी वाढत असल्यामुळे 3 मे नंतरही तिथे शिथीलता मिळण्याची शक्यता धूसर आहे. काही शासकीय अधिकार्‍यांच्या मते मुंबई , पुणे, पिंपरी चिंचवडचा लॉकडाऊन जूनमध्येही कायम राहू शकतो.  मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रातच राज्याचं आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्र केंद्रीत आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे येथील लॉकडाऊन शिथील करुन अर्थव्यवस्थेला चालना देण्याला सरकारचं प्राधान्य आहे, मात्र दररोज वाढणारी कोरोनाबाधित रुग्णसंख्या सरकारच्या काळजीत भर टाकत आहे. राज्य सरकारने काल जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 4447 होता तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात हा आकडा पाच हजारांपेक्षा जास्त आहे. तसंच एकट्या पुण्यात 848 तर पुणे महानगर प्रदेश क्षेत्रात 960 पर्यंत कोरोनाबाधित आहेत. कारखानदारी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण रोज वाढतच आहेत. संपूर्ण टाळेबंदी नंतरही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढत असल्याने प्रशासन त्रस्त आहे. त्यासाठी 27 एप्रिल पर्यंत बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता एकूण एक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. पहिल्यापेक्षा अधिक कठोरपणे संचारबंदी लागू केली आहे. कामाशिवाय कोणीही बाहेर दिसला तर थेट गुन्हा दाखल करण्यात येतो. छोट्या गल्ल्यांसह अंतर्गत रस्ते, मुख्य मार्ग सुध्दा निर्मनुष्य आहेत. कोरोनाचा प्रसार थांबत नसल्याने कुठलेही निर्बंध शिथिल होण्याची शक्यता दिसत नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्याने नागरिकांचेही सहकार्य आहे. उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी एका बड्या उद्योजकाने सरकारकडे केली होती, परंतु काही कामगार नेत्यांनी टाळेबंदी उठली तर कोरोनाचा उद्रेक होईल आणि त्याची जबाबदारी संबंधितांची राहिल असा पवित्रा घेतल्याने प्रशानाचीही कोंडी झाली आहे. चाळेबंदी उठविल्यास गर्दी वाढेल आणि कोरोनाचा कहर माजेल अशी शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केल्याने जून पर्यंत हा बंद कायम राहिल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

- Advertisement -

मुंबई -पुण्यातील दुकाने सुरु होणार नाहीत
देशभरात लॉकडाऊनमध्ये आजपासून मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत दिली असली तरी ही सवलत देताना काही अटी देखील घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु कंटेनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. त्यामुळे मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील दुकाने तुर्तास सुरू होणार नाहीत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रेसनोटनुसार, गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. परंतु कंटेनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. तसंच शहरांमध्येही महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपर्‍यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर बाजारपेठांमधील दुकानं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसंच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल.  मद्य विक्री करणार्‍या दुकांनाना सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचंही स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. सलून आणि ब्युटी पार्लर्स देखील बंद राहणार आहेत. तर ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे, असंही सरकारनं स्पष्ट केलंय. महत्वाचं म्हणजे या सवलती हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये लागू नाहीत. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने या शहरांतील दुकाने सुरू होणार नाहीत. आतापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला अशीच दुकानं सुरू होती. आता त्यात बदल करुन इतर दुकानं सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या