आता दररोज दीड लाख लोकांना मिळणार शिवभोजन थाळी
Featured

आता दररोज दीड लाख लोकांना मिळणार शिवभोजन थाळी

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – करोना विषाणूमुळं लागू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यसरकारने शिवभोजन थाळीच्या संख्येत 50 हजार ने वाढ केली असून राज्यात दररोज दीड लाख शिवभोजन थाळींचं वितरण केलं जाणार असल्याचं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यातील राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर, विद्यार्थी, स्थलांतरित आणि बेघरांना सरकारच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कष्टकर्‍यांचे हाल होऊ नये म्हणून राज्य सरकारने अवघ्या 5 रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली आहे. आतापर्यंत रोज एक लाख लोकांना शिवभोजन थाळी पुरवली जात होती. राज्य सरकारने 28 मार्च 2020 पासून तालुका स्तरावर शिवभोजन थाळी सुरू केली आहे. दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत ही थाळी देण्यात येते. आता प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे.

शहरी भागासाठी प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी 30 रुपये शासनाकडून देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने यापूर्वीच 160 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा लॉकडाऊनच्या काळात 2 मेपर्यंत वाढीव शिवभोजन थाळी योजनेचा लाभ सुरू राहणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

या निर्णयानुसार करोना विषाणू प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाहीत, त्यांना शिव भोजनाचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय तसेच पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Deshdoot
www.deshdoot.com