परदेशातून आलेल्यांची  नावे प्रशासनाला कळवा – महसूल मंत्री थोरात
Featured

परदेशातून आलेल्यांची नावे प्रशासनाला कळवा – महसूल मंत्री थोरात

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. आपला देश व राज्य शासनही त्याचा मुकाबला करीत आहे. अशावेळी हे संकट टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन , आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा जे जे प्रयत्न करीत आहेत, त्यांना प्रतिसाद द्या आणि स्वयंशिस्त पाळा. तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तींची नावे प्रशासनाला कळवा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील 126 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 73 जणांना जिल्हा रुग्णालय तसेच इतर रुग्णालयांत देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. उर्वरित 51 जणांना त्यांच्या घरी देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत दोन व्यक्ती कोरोना विषाणू संसर्गाने बाधित असल्याचे आढळून आल्याने त्यांचे विलगीकरण करुन स्वतंत्रपणे उपचार सुरु आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती महसूलमंत्री श्री. थोरात यांनी घेतली. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महसूलमंत्री थोरात यांना सध्या कोरोना विषाणू संसर्गासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यावर समाधान व्यक्त करीत थोरात म्हणाले, पुढील दोन आठवडे अतिशय महत्वाचे आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ज्या उपाययोजना केल्या आहेत, नागरिकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे, कारण ही सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. संसर्ग होऊ नये, तो वाढू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. संपर्क टाळा, असे आवाहनही त्यांनी केले. हे संकट वाढू नये, ही सर्वांची जबाबदारी आहे. संकट टाळायचं असेल तर स्वयंशिस्त आवश्यक आहे. कोरोना विषाणूचं संकट पुढच्या टप्प्यात जाणार नाही, यासाठीची आवश्यक ती सर्व दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. असे ते म्हणाले. जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात मागेपुढे पाहू नये. विषाणूचा प्रादुर्भाव पाहता याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे ते म्हणाले. नागरिकही स्वत: त्यांची काळजी घेतील, कारण या सर्व उपाययोजना त्यांच्यासाठीच असल्याचे थोरात यांनी सांगितले.
………………..
निर्भयाला न्याय
निर्भयाच्या मारेकर्‍यांना शुक्रवारी सकाळी फाशी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे निर्भयाला न्याय मिळाला असून फाशीच्या शिक्षेतून असे कृत्य करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्यात येत असल्याचा संदेश जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या शाहीनबाग आंदोलनकर्त्यांनी स्वत:ची आणि समाजाची दक्षता घेवून निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
…………….

Deshdoot
www.deshdoot.com