मदतकार्यात चमकोगिरी करणार्‍यांचे राज ठाकरेंनी टोचले कान
Featured

मदतकार्यात चमकोगिरी करणार्‍यांचे राज ठाकरेंनी टोचले कान

Dhananjay Shinde

सार्वमत
मुंबई – कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात गरिब, अबाल वृद्धांचे खायचे हाल होताहेत. यावेळी मदत देखील केली जात आहे. पण काहीजण मदत करताना फोटो काढतात. असे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अशा चमकोगिरी करणार्‍यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कान टोचले आहेत.

महाराष्ट्र भीषण परिस्थितीतून जात असताना गोरगरिबांना मदत करणार्‍या सर्वांचे राज ठाकरे यांनी आभारही मानले. मात्र काहीजणांकडून मदतकार्याची छायाचित्रं काढणे, ज्याला मदत दिली जात आहे त्याला कॅमेर्‍यात बघण्यास सांगणे किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्रं काढणे असे प्रकार सुरु आहेत. या चुकीच्या गोष्टी असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले आहे.

प्रत्येक माणूस हा स्वाभीमानी असतो. त्याला अशा मदतीची अपेक्षा नसते. पण सध्याची परिस्थिती बिकट आहे. म्हणून त्यांना सहाय्याची गरज आहे. अशा वेळेस त्याची छायाचित्रं काढून त्याची मान शरमेने खाली घालणं कितपत योग्य आहे? तसंच मदतकर्त्याने देखील कॅमेर्‍यात बघत फोटो काढणं हे सुद्धा योग्य आहे का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबरच अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनीही याचा विचार करावा. महाराष्ट्राच्या निरपेक्ष सेवेची परंपरा दाखवून देण्याची ही वेळ आहे. या परंपरेचे दर्शन आपण पुन्हा एकदा घडवूया, असे त्यांनी म्हटले आहे. सामाजिक संस्थांनी मदतकार्य करताना स्वत:ची, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Deshdoot
www.deshdoot.com