कोरोना : अख्खा नगर जिल्हा ‘लॉकडाऊन’
Featured

कोरोना : अख्खा नगर जिल्हा ‘लॉकडाऊन’

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाच्या भयानकतेचा सामना करण्यासाठी तसेच स्वतःची सुरक्षा आणि निरागीता सिध्द करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नगरकरांनी आर्थिक नुकसानीची पर्वा न करता जोरदार प्रतिसाद देत काल शुक्रवारी उत्स्फूर्तपणे अख्खा जिल्हा ‘लॉकडाऊन’ झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. दरम्यान,सर्वप्रथम बाधित झालेल्या रुग्णाचा काल एनआयव्हीकडे पाठविलेला अहवाल निगेटीव आला आहे. आता पुन्हा दुसरा स्त्राव नमुना आज तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव संशय असणार्‍या आणखी 25 व्यक्तींचा स्त्राव नमुन्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला. हे सर्व अहवाल कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले. अजून 78 व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 79 व्यक्तींना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर दोन बाधित व्यक्तींना बूथ हॉस्पिटल येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यात जिल्ह्यात पहिल्यांदा बाधीत आढळलेल्या  व्यक्तीची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली असून आता 24 तासात दुसरी चाचणी घेण्यात येणार असून ती निगेटीव्ह आल्यास त्यांना रुग्णालयातून सोडून घरी निगराणी खाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.कोरोनाचा विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक स्तरावर उपाययोजना सुरु केली आहे. नागरी व ग्रामीण भागात विविध बाबींना बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना ही बंदी लागू करण्यात आली आहे. विविध आस्थापनांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने वारंवार करण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत 155 नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले. शुक्रवारअखेर 75 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून त्यांना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यासाठी त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती बाहेर आढळून आल्यास जिल्हा प्रशासन अथवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम बाधित झालेल्या रुग्णाचा काल एनआयव्हीकडे पाठविलेला अहवाल निगेटीव आला आहे. आता पुन्हा दुसरा स्त्राव नमुना आज (शनिवारी) तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. शुक्रवारी 25 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले असून जिल्हा रुग्णालय, जुने दिपक हॉस्पिटल आणि बुथ हॉस्पिटल या ठिकाणी 79 रुग्ण आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहेत.

माजी प्रतिनिधी, उच्च शिक्षीत..
कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. नगर जिल्ह्यातील परदेशातून आलेल्या दोघांना कोरोना झाला. अनेकजण संशयित आहेत. आतापर्यंत जिल्हयातील 155 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी अनेकांचे अहवाल निगेटीव्ह आले. अजूनही 78 व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहेत. त्यात एक माजी प्रतिनिधी आणि उच्च शिक्षीतांचा भरणा अधिक आहे.

व्हेंटीलेटर घेण्यास मान्यता
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली. आरोग्य सुविधांसाठी आणि खासकरुन व्हेंटिलेटर खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीतून करण्यास मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडावी. कोणत्याही परिस्थितीत हे संकट आणखी वाढणार नाही, याची काळजी प्रत्येक जिल्हावासियांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

एसीचा वापर टाळा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसीचा (वातानुकुलित यंत्र) वापर बंद करा किंवा कमीत कमी एसीचा वापर करा, अशा सूचना राज्य सरकारने सर्व शासकीय अस्थापनांना दिल्या आहेत. राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एक परिपत्रक काढून सर्व शासकीय कार्यालयांना तसे आदेश दिले आहेत. कोरोनाची लागण शिंकणे किंवा खोकल्यातून होत असते. शिंकण्याने किंवा खोकल्याने कोरोनाचे विषाणू हवेत पसरतात. तसेच हवेतील धुळीकणांसोबत हे विषाणू विविध वस्तुंच्या पृष्ठभागावर स्थिरावतात. एसी सुरू असल्यास हे विषाणू अधिक काळ जिवंत राहतात. एसीमध्ये तापमान कमी असल्याने विषाणू मरत नाहीत. तापमान जास्त असेल तर विषाणू मरतात. त्यामुळे सर्व कार्यालयात एसीचा कमीत कमी वापर करा, गरजे पुरताच एसी सुरू करा किंवा एसी बंद ठेवा. त्याऐवजी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. तसेच आपल्या अख्त्यारित येणार्‍या सर्व कार्यालयांनाही तशा सूचना द्या, असे आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

गर्दी पूर्ण बंद करा : मुख्यमंत्री
नागरिकांनी सरकार ज्या ज्या सुचना देत आहे तेवढ्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. आमच्या आवाहनानंतर सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर गर्दी खूप कमी झाली आहे. मात्र तरी देखील आपण गर्दी पूर्ण बंद केली पाहिजे. आपण शासकीय कार्यालय, खासगी कार्यालयातील कर्मचार्‍यांची उपस्थिती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे तरीसुद्धा आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करा, सूचनांचे आणखी काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com