कोरोना रोखण्यासाठी नगर जिल्ह्यात दक्षता

शिर्डीतील साईबाबा मंदिर, शनि शिंगणापूर मंदिर परिसरात प्रतिबंधात्मक उपाय

अहमदनगर (प्रतिनिधी) – जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोना व्हायरसची भीती पसरत असताना आता अनेक देवस्थानांकडून कोरोनाबद्दल जनजागृती केली जात आहे. मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असणार्‍या राज्यातील शिर्डी, शनि शिंगणापूरसह प्रमुख मंदिरातही कोरोना व्हायरस पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय केला जात आहे. कोरोना व्हायरस संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आणि व्यवस्था करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शनि शिंगणापूर येथे मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात येत आहे. भोजनालयातही खबरदारी घेतली जात आहे.

शिर्डीच्या दोन्ही रूग्णालयात कक्ष

शिर्डी (प्रतिनिधी) – श्रीक्षेत्र शिर्डी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असल्याने या ठिकाणी परदेशातून तसेच परराज्यातून साईभक्त येत असतात. शिर्डीतील मंदिर परिसर व इतर गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरस पासून होणार्‍या आजारा विरुध्द प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी संस्थानच्या दोन्ही रुग्णालयात आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. श्री डोंगरे म्हणाले, जगभरातील काही देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. सदर व्हायरसची लागण झालेले काही रुग्ण भारतातही आढळून येत आहेत.  तेव्हा गर्दीच्या व आवश्यक त्याठिकाणी सदर व्हायरसमुळे होणार्‍या आजाराची लक्षणे व आजार होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून माहितीचे बोर्ड मंदिर परिसर, सर्व भक्तनिवासस्थान, साई प्रसादालय, दोन्ही रुग्णालये, रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्टँड आदी गर्दीचे ठिकाणी लावणेबाबत संबंधीत विभागांना सुचना दिल्या आहेत. स्वच्छता कर्मचारी आणि दैनंदिन स्वच्छतेच्या वेळापत्रकातही वाढ करण्यात आली आहे. यासोबतच साई संस्थानच्या वतीने विशेष वैद्यकीय पथकही नेमण्यात आलं आहे. तसेच कोणी संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ तपासणीच्या सुचना संस्थानाच्या वैद्यकीय पथकाला देण्यात आल्या आहेत.

बूथ हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी बूथ हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यांनी बूथ हॉस्पिटल येथे जाऊन संबंधित कक्षाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, महापालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. बोरगे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. नागरगोजे, बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स उपस्थित होते.

महावितरणमधील बायोमेट्रिक हजेरी बंद
अकोले प्रतिनिधीने कळविले की, महावितरण कंपनीने कोरोना विषाणूचा प्रसार कार्यालयामध्ये होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या राज्यभरातील कार्यालयांमधील कर्मचारी व अधिकार्‍यांची बायोमेट्रिक हजेरी पुढील आदेश येईपर्यंत गुरवारपासून स्थगित केली आहे.असा आशयाचा आदेश महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक कमांडर शिवाजी इंदलकर यांनी काढला आहे. महावितरण कंपनी मध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. मात्र सकाळी लवकर कार्यालयात यायला लागत आल्याने अनेकांना लेटमार्क पडत होता. मात्र कोरोना व्हायरसमुळे लेटलतिफ कर्मचार्‍यांना काही कालावधीसाठी दिलासा मिळाला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *