नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्यांपैकी 989 जण करोना पॉझिटिव्ह
Featured

नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्यांपैकी 989 जण करोना पॉझिटिव्ह

Dhananjay Shinde

सार्वमत

नांदेड – एका धार्मिक कार्यक्रमासाठी पंजाबमधून आलेले शीख यात्रेकरू लॉकडाउनमुळे जवळपास दीड महिनाभर नांदेडमध्येच अडकले होते. या यात्रेकरूंना आठ दहा दिवसांपूर्वी विशेष गाड्यांनी परत स्वगृही पाठवण्यात आलं. मात्र, नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या यात्रेकरुंपैकी तब्बल 989 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पंजाब सरकारची झोप उडाली असून, नांदेड प्रशासनही हादरलं आहे.

दरवर्षी होणार्‍या हल्ला महल्ला कार्यक्रमासाठी पंजाबमधून तीन हजार भाविक नांदेडमध्ये आले होते. त्यानंतर लॉकडाउन लागू झाल्यानंतर 40 दिवसांपासून हे भाविक मुक्कामाला होते. त्यांना परत नेण्यासाठी पंजाब सरकारकडून प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र सरकार आणि पंजाब सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर केंद्रानं त्यास परवानगी दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ट्रॅव्हल्सनं तेरा गाड्यामधून 1700 जणांना घरी सोडण्यात आलं. त्यानंतर टप्याटप्यानं इतरही यात्रेकरूंना पंजाब सरकार परत घेऊन गेलं. पण, या यात्रेकरूंची घेऊन जाण्याआधीच करोना चाचणी न केल्यानं आता ही धक्कादायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे.

पंजाबमध्ये या यात्रेकरूंची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल 989 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. 28 एप्रिल रोजी पंजाबमधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 510 पर्यंत होती. मात्र, अचानक रुग्ण वाढल्यानं पंजाबमधील रुग्णांची संख्या बुधवारी (6 मे) 1451 वर पोहोचली आहे.

नांदेडमधील 20 सेवक, 6 चालकही करोनाग्रस्त
पंजाबमधील सुरूवातीची आकडेवारी समोर आल्यानंतर नांदेड जिल्हा प्रशासनानं तातडीनं तपासणी करण्याचं काम हाती घेतलं. या यात्रेकरूंच्या सेवेत असलेल्या सेवेकर्‍यांची चाचणी करण्यात आली. यात 20 जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर यात्रेकरूंना सोडण्यासाठी गेलेल्या 6 चालकांनाही करोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं असून, उपचार करण्यात येत आहे. नांदेडमधील करोनाग्रस्तांचा आकडा 31 झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com