खासगी कार्यालयांसह ‘या’ गोष्टींवरील निर्बंध शिथिल
Featured

खासगी कार्यालयांसह ‘या’ गोष्टींवरील निर्बंध शिथिल

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादात खासगी कार्यालये सुरु करण्याबाबत भाष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर 8 जूनपासून खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने यासंदर्भातील ट्विट केले आहे.

शासन निर्णयानुसार, खासगी कार्यालयात 10 टक्के कर्मचारी किंवा 10 कर्मचारी व जो आकडा जास्त असेल त्या क्षमतेने कामकाज सुरू करता येईल. तर इतर कर्मचार्‍यांना घरूनच म्हणजे वर्क फ्रॉम होम करावं लागेल. यासह कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेईल, असं म्हटलं आहे. यासह अन्य काही नियमांत देखील शिथिलता देण्यात आली आहे.

याफ निर्बंधात शिथिलता
खासगी कार्यालयांसोबतच अन्य बाबतीत लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सध्या जिम जरी सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

मॉर्निंग वॉक, जॉगिंगला परवानगी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी यावेळी व्यायामाचं कोणतेही साहित्य हे गार्डनमधील जिम, ओपन एअर जिममध्ये वापरता येणार नाही.

यासह दुकानं सम आणि विषम नियमाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं खुली राहतील. याची जबाबदारी पोलीस आणि महापालिका आयुक्तांवर असणार आहे.

7 जूनपासून वृत्तपत्र घरपोच विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी स्वछतेच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

शैक्षणिक संस्था शिकवण्याचं काम सोडून इतर कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शैक्षणिक संस्थेचे कमर्चारी ऑनलाईन शिक्षणासाठी अभ्यासक्रम विकसित करणे, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल जाहीर करणे आदी कामं करता येतील.

मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी आता पासची गरज नाही. यावर कोणतेही निर्बंध नसणार.

Deshdoot
www.deshdoot.com