श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेतील बांधकामे काढून टाकण्याचे आदेश
Featured

श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेतील बांधकामे काढून टाकण्याचे आदेश

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

शेवगाव ( तालुका प्रतिनिधी ) – शेवगाव शहरातील नेवासे रस्त्यावरील बहुचर्चित श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेतील बांधकामे काढून टाकण्याचे आदेश प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी तहसीलदार व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काही हेक्टर क्षेत्रातील जागेवर अनेक निवासी इमारती, हाँटेल, दुकाने, शोरूम असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत प्रांताधिकारी केकाण यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या महसुल व वनविभागाने काढलेल्या परिपत्रकान्वये राज्यातील देवस्थान जमिनीची तपासणी करुन त्यातील बेकायदेशीर हस्तांतरीत झालेल्या जमिनीच्या नोंदीचे पुनरिक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शेवगाव शहरातील गट नंबर 1313,1314,1315 मधील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या इनाम वर्ग 3 मधील जमिनीचा बेकायदेशीर भाडेपट्टा करार रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव शेवगावचे तहसिलदारांमार्फत सादर करण्यात आला होता.

याबाबतच्या नोदींचे पुर्नरिक्षण करण्यासाठी सर्व संबंधीतांना लेखी व तोंडी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. संबंधीत पुनरिक्षण प्रकरणाचा निकाल प्रांताधिकारी यांच्या कार्यालयामार्फत पारीत करण्यात आला असून त्यामध्ये गट नंबर 1313 वरील 2901 व इतर भाडे पट्टा फेरफार. गट नंबर 1314 वरील 2902 व इतर भाटेपट्टा फेरफार व 1315 वरील एक व इतर भाटेपट्टा फेरपारच्या इतर हक्कात घेण्यात आलेल्या भाटेपट्टयाच्या फेरफार नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या देवस्थान ट्रस्टच्या या तीनही गट नंबरच्या जागेमधील अनाधिकृत बांधकामे काढून टाकण्यासाठी संयुक्त स्वरुपाची मोहीम हाती घेण्यात यावी. याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com