दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी केंद्राची सशर्त परवानगी

दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी केंद्राची सशर्त परवानगी

सार्वमत

नवी दिल्ली – करोनामुळे असलेल्या लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. राज्यांच्या मागणीनंतर ही परवानगी देण्यात आली आहे. याविषयी केंद्रानं नियमावलीही जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिली. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन लॉकडाउनच्या काळात परीक्षा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यांना आणि इतर बोर्डांना दहावी बारावीच्या परीक्षा घेता येणार असून, सोशल डिस्टसिंगसह काही बाबींचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं शाह म्हणाले.

सीबीएसई बोर्ड आणि अनेक राज्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात केंद्राकडं विनंती केली होती. करोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं चौथ्यांदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यांकडून होणार्‍या मागणीला परवानगी दिली आहे. राज्य शैक्षणिक मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांना परीक्षा घेण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी तसं पत्र राज्यांच्या सचिवांना पाठवलं आहे.

दरम्यान करोनाचा फटका जवळपास सर्वच क्षेत्रांना बसला आहे. करोनाने शैक्षणिक क्षेत्राचं वेळापत्रकच कोलमडलं आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यानंतर सातत्यानं तीन वेळा लॉकडाउन वाढवण्यात आल्यानं दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक राज्यातील बोर्डाच्या परीक्षांसह सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

कंटेनमेंट झोनमध्ये परीक्षा केंद्र नको – कंटेनमेंट झोनमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यास केंद्राने स्पष्ट नकार दिला आहे. त्याचबरोबर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मास्क घालणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची थर्मल चाचणी करण्यात यावी. परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टसिंगचं पालन केलं जावं. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश केंद्राने राज्यांना दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com