सहकारी संस्था निवडणुकीसाठी रणधुमाळीला प्रारंभ; देवळा, सुरगाणा बाजार समित्यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे प्रलंबित
Featured

सहकारी संस्था निवडणुकीसाठी रणधुमाळीला प्रारंभ; देवळा, सुरगाणा बाजार समित्यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे प्रलंबित

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, वर्षभरापूर्वी मुदत संपलेल्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला 31 मेपर्यंत मुदतवाढ मिळाली असून फेब्रुवारी 2019 मध्ये मुदत संपलेल्या देवळा व सुरगाणा बाजार समित्यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव मात्र सहकार विभागाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे या बाजार समित्यांना मुदतवाढ मिळणार की निवडणूक कार्यक्रम घोषित होणार याकडे लक्ष वेधले गेले आहे.

जिल्ह्याचे आर्थिक केंद्र समजल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाशिक व पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होणार आहेत. नांदगाव, येवला, सिन्नर, चांदवड, कळवण व नाशिक या बाजार समित्यांची मुदत ऑगस्ट 2020 मध्ये संपुष्टात येणार आहे. तर मनमाड बाजार समितीची मुदत फेब्रुवारी 2021 मध्ये संपणार आहे. त्यामुळे चालू वर्षात सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या निवडणुकांचा बिगुल वाजेल. घोटी बाजार समितीची मुदत 27 मार्च 2019 रोजी संपुष्टात आली, तर देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत 11 फेब्रुवारी 2019 रोजी संपुष्टात आली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. विधानसभा निवडणुक प्रक्रिया संपल्याने या दोन्ही बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना घोटी बाजार समितीला पाच महिन्यांपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत मे 2020 मध्ये संपत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात बँकेची निवडणूक घोषित होण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत केदा आहेर यांच्या रूपाने भाजपचा अध्यक्ष आहे. त्यामुळे बँक ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक छोट्या-मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत.

दहा सोसायट्यांचे मतदान

देवळा, चांदवड, सटाणा, इगतपुरी तालुक्यांतील दहा सहकारी संस्थांची निवडणूक 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यामध्ये कै. देवराम सदा पाटील सहकारी संस्था, देवपूरवाडी (ता. देवळा), डोंगरगाव सहकारी संस्था (ता. चांदवड), भडाने सहकारी संस्था, भडाने (ता. चांदवड), गोहरण सहकारी संस्था, (ता. चांदवड), धांद्री सहकारी संस्था (ता. सटाणा), तळवाडे भामेर सहकारी संस्था, (ता. सटाणा), आवळी आदिवासी सहकारी संस्था, (ता. इगतपुरी), खडकेद आदिवासी सहकारी संस्था, खडकेद (ता. इगतपुरी), अंजनेरी सहकारी संस्था (ता. त्र्यंबकेश्वर), खरवळ आदिवासी सहकारी संस्था (ता. त्र्यंबकेश्वर) या सहकारी संस्थांची पंचवार्षिक निवडणूक होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com