कमी आमदारांत सरकार  हा पवारांचा चमत्कार
Featured

कमी आमदारांत सरकार हा पवारांचा चमत्कार

Sarvmat Digital

मुख्यमंत्री ठाकरे : शेतकर्‍यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार

पुणे (प्रतिनिधि) – शेतकर्‍यांनी ज्याप्रमाणे कमी जागेत जास्त पीक घेतलं, त्याप्रमाणे शरद पवारांनी कमीत कमी आमदारांमध्ये सरकार स्थापन करण्याचा चमत्कार करून दाखवला. जागा जास्त आहे, आमचंच पीक येणार असं कोणी आता म्हणू शकत नाही. आम्ही कमी जागांमध्ये तुमच्यावर मात करू शकतो हे दाखवून दिलं आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

साखर उद्योग शेतकर्‍यांचा कणा असून शेतकर्‍यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. शेतकर्‍यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बुधवारी पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेची 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, सहकार मंत्री तथा अर्थमंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार अजित पवार, राजेश टोपे, कलप्पा आवाडे, हर्षवर्धन पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, इंडियन शुगर अध्यक्ष रोहित पवार, बाळासाहेब पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.

साखर उद्योग शेतकर्‍यांचा कणा असून शेतकर्‍यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. शेतकर्‍यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. तसेच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन तातडीने निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तज्ज्ञ समिती स्थापन करणार
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मोठे योगदान आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत व्हीएसआयच्या माध्यमातून पोहोचत असते. त्यामुळेच साखर उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी आहे. साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी सरकारच्यावतीने एक तज्ज्ञांची समिती स्थापन करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जमुक्ती होणारच
शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा अस्तित्त्वात आणल्याशिवाय राहणारच नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दोन लाखांच्या वरील टप्प्यासाठी आपण विचार करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले. तसंच नियमित कर्ज भरणार्‍यांचाही विचार करणार असल्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं.

Deshdoot
www.deshdoot.com