साखर उद्योग जगविण्यासाठी पुढाकार घ्या
Featured

साखर उद्योग जगविण्यासाठी पुढाकार घ्या

Sarvmat Digital

मुख्यमंत्री ठाकरे यांचे कारखानदार व शेतकर्‍यांना आवाहन

पुणे (प्रतिनिधी)- साखरेची उत्पादकता वाढविण्याबरोबरच साखरेच्या उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असून यावर कारखान्यांनी विचार करावा. उसासारख्या शाश्वत उत्पन्न देणार्‍या उद्योगाला जगविण्यासाठी सरकारबरोबर साखर कारखानदार आणि शेतकर्‍यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था शेतकर्‍यावर अवलंबून आहे. सध्या दुसर्‍याच्या आयुष्यात गोडवा वाटणार्‍या शेतकर्‍याचं आयुष्य उसाच्या चिपाडासारख होत आहे, त्यामुळे राज्यकर्त्यांनी या शेतकर्‍यांकडे लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

सहकार क्षेत्र आणि राजकारण वेगळं केलं जाऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्र मजबूत केलं आहे. साखर कारखानदारी आणि साखर क्षेत्राने अनेक नेते दिले असे सांगत ठाकरेंनी लहानपणी उसाचा रस पिण्यासाठी मिळायचा याची आठवण सांगितली. आम्ही शाळेत जायचो तेव्हा रस्त्यावर ठिकठिकाणी उसाचा रस पिण्यासाठी मिळायचा. उसाची गुर्‍हाळं नाक्यावर असायची. ऊन्हात गार उसाचा रस पिऊन बरं वाटायचं.

पण गुर्‍हाळात एका बाजूने गेलेला रसरशीत ऊस दुसर्‍या बाजूने चिपाड होऊन बाहेर पडतोय याकडे आमचं लक्ष नसायचं. ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकर्‍यावर अवलंबून आहे. दुसर्‍याच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकर्‍याच्या आयुष्याचं चिपाड होत आहे. जर राज्यकर्त्यांनी, आम्ही याकडे लक्ष दिलं नाही तर या कार्यक्रमाला काही अर्थ नाही, असे ठाकरे म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत आहे. गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यातील को-जनरेशन प्रकल्प शेतकर्‍यांच्या उसाला अधिकचा दर देण्याचा उपाय आहे. राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आहे. गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यातील को-जनरेशन प्रकल्प शेतकर्‍यांच्या उसाला अधिकचा दर देण्याचा उपाय आहे. सहकारी साखर कारखानदारी शेतकर्‍यांना आर्थिक सक्षमीकरण करण्याचा मुख्य कणा असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यात रंगल्या गप्पा
राजकारणात एकमेकांचे पक्के वैरी म्हणून सर्वश्रुत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील हे बुधवारी खुर्चीला खुर्ची लावून बसलेले पहायला मिळाले. केवळ खुर्चीला खुर्चीच नाहीतर दोघांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. याची जोरदार चर्चा रंगली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमास पोहोचण्यास उशीर होत असल्याने व्यासपीठावर नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. यावेळी हे दोन नेते एकामेकांशी गप्पा करण्यात व्यस्त होते. व्यासपीठावर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये कल्लपण्णा आवाडे यांच्या नावाची पाटी होती. अजित पवारांनी आवाडे यांच्या नावाची पाटी बाजूला सारून पाटील यांची पाटी शेजारी ठेवत त्यांना शेजारी बसवून घेतले. त्यानंतर कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये हशा पिकला. दोघे कार्यक्रम संपेपर्यंत विविध विषयांवर चर्चा करताना दिसले. संपूर्ण कार्यक्रमात हाच चर्चेचा विषयही झाला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात स्थानिक राजकारणावरून मतभेद आहेत. काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करताना हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष सोडण्याचं सगळं खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडलं होतं. तर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, असा उपरोधिक टोलाही पाटील यांनी हाणला होता. त्याची अनेकांना बुधवारी आठवण झाली.

गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न आवश्यक- पवार
शरद पवार म्हणाले, उसाच्या व ऊस कारखानदारीच्या संबंधातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही देशातील अग्रगण्य संस्था आहे. ऊस उतारा, उत्पादन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक कारखान्यांनी ऊस विकासासाठी विशेष लक्ष द्यावे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. साखर व्यवसाय हा महाराष्ट्रातील ग्रामीण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. या व्यवसायामुळे राज्याला चांगले आर्थिक उत्पन्न होत आहे. उसाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक कारखान्यांनी ऊस विकास कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com