ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

पीक वाचविण्यासाठी कीडनाशकांची फवारणी; शेतकरी चिंताग्रस्त

टिळकनगर (वार्ताहर) – गेल्या आठवड्यापासून सततचे ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, मका यासह भाजीपाला पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कीडनाशकांची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न तालुक्यातील एकलहरे, उक्कलगाव येथील शेतकरी करीत आहेत.

गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आलेले आहे. तर सप्टेबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनेही खरीप पिके पूर्णपणे वाया गेली. त्यामुळे नव्या उमेदीने शेतकर्‍यांनी रब्बी पिके घेतली. मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिके वाया जाण्याची धास्तीने एकलहरे, उक्कलगाव येथील शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. रब्बी हंगामासाठी विहिरींमध्ये पाणी आहे, पण रब्बीतील गहू आणि हरभर्‍याच्या वाढीसाठी पूरक वातावरणाची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा विपरित परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.

स्वच्छ वातावरण आणि गारठा असेल तरच गव्हाची आणि हरभर्‍याची वाढ जोमदार होऊ शकेल. पावसाळी वातावरण आणि ढग कायम राहिले तर खरिपाप्रमाणेच रब्बीचे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.

यावर्षी कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. त्याचबरोबर गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना देखील शेतकर्‍यांनी प्राधान्य दिले. मात्र गेल्या आठवड्याभरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रब्बी पिकांना रोगराईने ग्रासले आहे.

तर गव्हाची पेरणी होऊन तीन आठवडे ते एक महिना होत आला. मात्र पुरेशा थंडीअभावी गव्हाची वाढ देखील खुंटली आहे. दोन दिवसांपूर्वी काही ठिकाणी पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे या वातावरणामुळे गव्हावर तांबेरा तर हरभर्‍यावर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागला आहे. असेच वातावरण काही दिवस टिकून राहिले तर खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिके देखील वाया जाण्याची चिंता शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका गहू व हरभरा या पिकांना बसण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे मावा, अळी बरोबरच रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. हतबल होत येथील शेतकरी महागडी कीडनाशके घेऊन ती पिकावर फवारणी करीत आहेत.
– सिराज आलम, प्रगतिशील शेतकरी एकलहरे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com