Wednesday, April 24, 2024
Homeनगरपरिचर आणि सफाई कामगारांमुळे 13 गावे ‘व्हेंटीलेटर’वर

परिचर आणि सफाई कामगारांमुळे 13 गावे ‘व्हेंटीलेटर’वर

उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छता कोमात; अधिकार्‍यांनी घेतली झाडाझडती

उंबरे (वार्ताहर)- आरोग्य केंद्रात येणार्‍या रूग्णांना अत्यंत चांगली वैद्यकीय सेवा दिली जाते. मात्र, परिचरांकडून रूग्णांची हेळसांड करून आरोग्य केंद्रातील स्वच्छता कोमात गेल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी तातडीने दखल घेत राहुरी तालुक्यातील उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन ‘वशिल्याचे तट्टू’ असलेल्या परिचरांची चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांच्या निष्क्रियतेचा ठपका आरोग्याधिकार्‍यांवर ठेऊन त्यांचीही जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. या चौकडीमुळे तेरा गावांतील तब्बल 70 हजार लाभार्थी ग्रामस्थांना ‘व्हेंटीलेटर’ची वेळ आली आहे.

- Advertisement -

उंबरे आरोग्य केंद्रात तीन परिचर व एक सफाई कामगार असे चौघेजण सेवेत आहेत. मात्र, चार कामगार असूनही उंबरे आरोग्य केंद्रात कायमच स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असतो. कामावर असूनही कामचुकारपणा करणार्‍यांना संबंधित अधिकार्‍यांनी काम सांगितले, किंवा नोटीस काढली तर त्यांनाच धमकी दिली जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे अनेकदा आरोग्य केंद्राची सेवा कोलमडून जात आहे. पर्यायाने त्याचा परिणाम रूग्णसेवेवर होत असल्याची चर्चा आहे. परिचरांचा राग वैद्यकीय अधिकार्‍यांवर काढला जात असून त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांनीही या चौघांपुढे हात टेकले असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे या परिचर आणि सफाई कर्मचार्‍यांची अन्यत्र बदली करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

राहुरी तालुक्यातील उंबरे, ब्राम्हणी, वांबोरी, कुक्कडवेढे, धामोरी खुर्द, धामोरी बु., खडांबे खुर्द, खडांबे बु., कात्रड, गुंजाळे, बाभुळगाव, मोकळ ओहळ, चेडगाव, यासह 13 गावांतील रूग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राला ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील व जिल्हा परिषद सदस्या शशिकलाताई पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव मदत केलेली आहे. सध्या तब्बल 70 हजार रूग्णांना या केंद्राचा फायदा होतो. केंद्रात दररोज 90 रूग्णांसाठी चांगल्या सुविधा आहेत. त्यामुळे तालुक्याबाहेरूनही रूग्ण येथील आरोग्य केंद्रात येतात. हे उपकेंद्र प्रसुती व शस्त्रक्रियेसाठी नावाजलेले असल्याने जिल्ह्यातील रूग्ण येथे येतात.

या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी विजेची स्वतंत्र व्यवस्था नाही. इनव्हर्टर नाही, त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांना प्रसुतीच्या शस्त्रक्रिया चक्क मोबाईलच्या टॉर्चवर करण्याची वेळ येत आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णांना रात्रीच्या वेळी मेणबत्त्या लावून औषधोपचार करण्याची वेळ येत असल्याची धक्कादायक बाब चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी येथे तातडीने विजेची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या