Thursday, April 25, 2024
Homeनगरनगरला खमक्या पोलीस अधीक्षकांची प्रतीक्षा

नगरला खमक्या पोलीस अधीक्षकांची प्रतीक्षा

गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ; गावठी कट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात दहशत

अहमदनगर- जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू पुढील शिक्षणासाठी लंडनला गेल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कारभार सागर पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पंधरा दिवस लोटले तरी अद्याप जिल्हाचे पोलीस अधीक्षक प्रभारीच आहेत. जिल्ह्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून गुन्हेगारीत वाढ झाली असून गुन्हेगारीचे पायमूळ नष्ट करण्यासाठी खमक्या पोलीस अधिक्षकांच्या प्रतिक्षेत नगरकर आहेत.

- Advertisement -

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मार्च 2019 मध्ये सिंधू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वचक निर्माण केला नसला तरी जळगाव येथील कामगिरीचा प्रभाव असल्याने गुन्हेगारांवर वचक राहिला. त्यांनी काही सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए, मोक्का अंतर्गत कारवाई करत एकप्रकारे इशाराच दिला होता. यापूर्वी कधी झाल्या नाही, एवढ्या एमपीडीए कारवाई सिंधू यांच्या काळात झाल्या. यामुळे काही काळ गुन्हेगारी शांत होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर सर्व सण-उत्सव शांततेत पार पडले. सिंधू यांना जाण्यापूर्वीच नगर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले. येणार्‍या जिल्हा पोलीस अधिक्षकांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान असेल.

चोरांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचा प्रकार झाल्यानंतर जिल्हा कारागृहात बंदीस्त आरोपीने महिला पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. श्रीरामपूर शहरात गोळीबार झाला. यानंतर राहाता शहरात पोलिसांवर गोळीबार झाला. लोणीत गोळीबार होऊन एकाची हत्या झाली, यानंतर पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूरमध्ये गोळीबार होऊन सरपंचाची हत्या करण्यात आली. मध्यतंरी नगर शहरातून प्रसिद्ध उद्योगपतीचे अपहरण करण्यात आले.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाट आहेत. पोलिसांना तो सापडत नसल्याने आज पण या उद्योगपतीसह त्यांच्या कुटुंबाला धोका आहे. मुलीवर अत्याचार, रस्ता लूट, चोर्‍या या घटना वाढल्या आहेत. मध्यंतरी कर्जत, कोपरगाव, पारनेरमध्ये वाळू तस्कराने महसूलच्या पथकावर हल्ले केले. वाळू तस्करी हे नगरच्या गुन्हेगारीचे मूळ आहे. यावर वचक राहिला तर गुन्हेगारीला बर्‍यापैकी आळा बसतो. सिंधू यांनी वाळूतस्करी रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलले होते.

गोळीबारांच्या वाढत्या घटना पाहता गावठी कट्टे कोठून येतात, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. गावठी कट्टे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात असून पोलिसांना ते सापडत नाहीत. गावठी कट्ट्यांच्या माध्यमातून गुन्हेगार दहशत निर्माण करत आहेत. रंजनकुमार शर्मा यांच्या काळात नगर जिल्ह्यातील गावठी कट्टे विरोधात धडक मोहीम राबविली होती. नंतर ही मोहीम थंडावली ती कायमचीच. गेल्या दोन ते तीन महिन्यांत गोळीबाराच्या अनेक घटना वाढत असून, हे गावठी कट्टे मोठ्याप्रमाणात असल्याचे द्योतक आहे. गोळीबाराबरोबरच, वाळूतस्करांचे हल्ले, रस्ता लुटी, चोर्‍या-घरफोड्या यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळेच नवीन अधिकारी कसा असेल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वाढदिवस साजरा करण्यातून गुन्हेगारी
हल्ली शहरासह ग्रामीण भागात वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची नवीन पद्धत तरुणाईमध्ये आली आहे. सार्वजनिक ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. केक कापण्यासाठी तलवारीचा वापर केला जातो. मोठ्याप्रमाणात तरुणाई गोळा करून वाढदिवस ज्याचा आहे तो एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करत असतो. यामुळे तरुणांमध्ये गट निर्माण होत आहेत. यातून गुन्हेगारी जन्माला येत आहे. वाढदिवस साजरा करणार्‍यांवर वचक निर्माण केल्यास गुन्हेगारीचे मूळ रोखले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या