Friday, April 26, 2024
Homeनगरनगरचे व्यापारी कारवाईने अन् भिंगारकर पाणीप्रश्नाने हैराण… परेशान…

नगरचे व्यापारी कारवाईने अन् भिंगारकर पाणीप्रश्नाने हैराण… परेशान…

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या प्लॅस्टिक विरोधी कारवाईने नगरमधील व्यापारी हैराण झालेत, तर छावणी मंडळाच्या वेळकाढू धोरणामुळे भिंगारकर पाण्यासाठी परेशान आहेत. हैराणी-परेशानी सोडविण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी आज शनिवारी कलेक्टर अन् कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओंची भेट घेत लक्ष वेधले.

महापालिकेच्या पथकाचा झोल

धोरण निश्चित करण्याची सूचना

- Advertisement -

महापालिकेने प्लॅस्टिक वापराविरोधात सुरू केलेल्या कारवाईत झोलझाल होत असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. कलेक्टर तथा प्रभारी आयुक्तांनी यात लक्ष घालण्याची मागणी आ. जगतापांनी आज शनिवारी केली.

गुरूवार, शुक्रवार सलग दोन दिवस महापालिकेने नगर शहरात प्लॅस्टिक वापरणार्‍या व्यापारी, व्यावसायिकांविरोधात कारवाई राबविली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे सव्वा लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मात्र महापालिकेचे पथक व व्यापारी वर्गात खटके उडत आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर कारवाई करणे अपेक्षित असताना पथक त्याची कोणतीच खातरजमा न करता सरसकट कारवाई करत आहेत. व्यापार्‍यांकडून आकारण्यात येणारा दंड ही नियमानुसार आकारला जात नाही. व्यापारी वर्गावर हा अन्याय असल्याची भावना निर्माण झाली आहे. शासन नियमानुसार कारवाई करण्यात यावी तसेच दंडाची रक्कम वसूल करण्याचे धोरण निश्चित करावे अशी मागणी आ. जगताप यांनी कलेक्टर राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

पाणीबाणी अन् हेळसांड

स्वतंत्र पाणीयोजना राबविण्याची केली मागणी

भिंगारमध्ये बिकट बनलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविण्यात यावी. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून भिंगारकर वंचित असल्याचे सांगत त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावेत, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी केली आहे. कॅन्टोमेंटच्या सीईओंची भेट घेत आ. जगताप यांनी यासंदर्भात चर्चा केली.

भिंगार छावणी मंडळाच्या हद्दीत विकासाचा मोठा अनुशेष आहे. आमदार निधी तोकडा असल्याने भिंगारमध्ये विकास कामे करताना मर्यादा येतात. केंद्र शासनाने देशातील छावणी मंडळांना क वर्ग नगरपालिकेचा दर्जा दिलेला आहे. राज्य शासनाच्या विविध योजना राबविणे सोईस्कर व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. छावणी मंडळाचे त्याकडे दुर्लक्ष झाले असून अजूनपर्यंत केंद्राच्या संरक्षण खात्याची तसेच मान्यता घेऊन पाठपुरावाही केलेला नाही. पर्यायाने भिंगारकर राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आल्याचे आ. जगताप यांनी छावणी मंडळाच्या सीओंचे लक्ष वेधले. भिंगारच्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा आवश्यक असून त्यातून भिंगारमध्ये मुलभूत सुविधा राबविणे शक्य होणार आहे.

भिंगारमध्ये कॅन्टोमेंटचे रुग्णालाय आहे, पण तेथे डॉक्टर आणि कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने रुग्णांची हेळसांड सुरू असल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला आहे. रुग्णांवर वेळेवर आणि योग्य उपचार होत नसल्याचे सांगत तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी वाढविण्याची मागणी आ. जगताप यांनी केली.

जॉगिंग ट्रॅकमध्ये योगा केंद्र उभारा
भिंगारमध्ये भगवान गौतम बुध्द जॉगिंग ट्रॅक आहे. तेथे सकाळी सकाळी भिंगारकर योगासने करतात. मात्र तेथे कोणतीच सुविधा नाही. छावणी मंडळाने तेथे योगासने ओटे बांधावे किंवा योगा केंद्र उभारण्याची मागणी आ. जगताप यांनी कॅन्टोमेंटच्या सीईओंकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या