नगर: शहरात डेंग्यूचा आणखी एक बळी

नगर: शहरात डेंग्यूचा आणखी एक बळी

कोठी येथील सुजाता मकासरे यांचा मृत्यू

अहमदनगर (प्रतिनिधी)- अस्वच्छतेमुळे शहरात फैलावलेली डेंग्युची साथ अजूनही कमी झालेली नाही. आज सकाळी कोठी येथील एका महिलेचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. आता तरी महापालिकेने स्वच्छता मोहिम राबवावी, अशी मागणी कोठी नागरिकांनी केली आहे.

सुजाता सुरेश मकासरे (वय 45, रा.कोठी) असे डेंग्यूुने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. डेंग्यू सदृश्य आजाराने काही दिवसापासून त्या आजारी होत्या. शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालावली. कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समजते.

कोठी भागातील स्वच्छतेच्या प्रश्नासाठी स्वप्निल शिंदे, संजय कांबळे, सुधीर गायकवाड, सुशांत देवडे, बबलू गायकवाड, थॉमसन केदारे, रवी पोळ, शंकर शिरोळे, रावसाहेब अरुण, रमाकांत सोनवणे, योगेश कसबे, राजू कांबळे यांचे शिष्टमंडळ प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यास जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कोठी येथे अनेक भागात अस्वच्छता पसरलेली असून, गटारी देखील तुंबलेल्या अवस्थेत आहे. या प्रश्नांवर मनपा प्रशासन तसेच प्रभागातील नगरसेवक देखील लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महापालिकेने औषध फवारणी व फॉगिंग देखील केली नसल्याची माहिती स्वप्निल शिंदे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com