दत्ताच्या दारी भक्तांची वारी..
Featured

दत्ताच्या दारी भक्तांची वारी..

Sarvmat Digital

देवगडसह शहरात जयंती साजरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहर व उपनगरातील दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. नेवासा तालुक्यातील देवगड येथे भक्तांचा मेळा भरल्याचे चित्र दिसून आले. श्री दत्त नामाच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. श्री दत्तजयंती निमित्त सावेडी, तोफखाना, माळीवाडा भागातील दत्त मंदिरात दर्शनासाठी नगरकरांनी गर्दी केली. अनेक ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आले.

नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे भाविक भक्तांची श्री दत्त दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दिगंबरा दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा… या श्रीदत्त नामाच्या जयघोषाने नगर आणि देवगडनगरी दुमदुमली होती.

भू-लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे आज बुधवारी दत्तजयंती निमित्त पहाटेच्या सुमारास गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीसह तळघरातील समाधीची पूजा करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र आचार्य शरदगुरू काटकर व भेंडा येथील गणेशदेवा कुलकर्णी व ब्रम्हवृंद मंडळींनी केले.

श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्तजयंती सोहळ्याचा राज्यात नावलौकिक असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेण्यासाठी देवगड येथे दाखल झाले होते. पहाटे पासूनच दर्शनासाठी येथे रांगा लागल्या होत्या. दुपारच्या सत्रात सात दिवस सुरू असलेल्या श्री दत्त यागाची गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते होमकुंडात श्रीफळ अर्पण करून पूर्णाहुती देण्यात आली.
भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, पोलीस मित्र संघटनेचे स्वयंसेवक तसेच देवगड भक्त मंडळाच्या स्वयंसेवकांनी पोलिसांना मदत केली.

Deshdoot
www.deshdoot.com