Wednesday, April 24, 2024
Homeनगरनागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ श्रीरामपुरात रॅली

नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ श्रीरामपुरात रॅली

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय विचार मंच यांच्यावतीने नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ श्रीरामपुरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान मंदिरापासून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. रॅली मेनरोड मार्गे शहीद भगतसिंग चौक, गिरमे चौक, शिवाजी चौक गांधी पुतळा मार्गे आझाद मैदान येथे जाऊन रॅलीची सांगता झाली.

यावेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते, पंडित महेश व्यास, प्रभातचे किशोर निर्मळ, राजेंद्र सोनवणे, कुणाल करंडे, डॉ. दिलीप शिरसाठ, देविदास चव्हाण, बाबासाहेब शिंदे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी अ‍ॅड. जीवन पांडे यांनी सिटीजन अमेंडमेंट अ‍ॅक्ट विषयी सांगितले. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. दुसर्‍या देशातून आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, ख्रिश्चन आदी नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे. दुसर्‍या कोणत्याही नागरिकांचे नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही. त्यांनी फक्त 25 मार्च 1971 पूर्वीपासून भारतीय असल्याचा पुरावा द्यायचा आहे. त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे पांडे म्हणाले.

- Advertisement -

पंडित महेश व्यास म्हणाले, या कायद्याला विरोध म्हणून संपूर्ण देशामध्ये वातावरण निर्माण करण्यात आलं. विनाकारण या कायद्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले. देशाचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय घेऊन जाण्याचा त्यांचा उद्देश आहे. येथील लोकांवर अत्याचार होत आहे, असं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा या लोकांचा उद्देश आहे. भारत देशाचे विभाजन झाल्यानंतर तेथील अनेक लोक भारतात आले.

मात्र त्यांना येथील नागरिकत्व मिळाले नाही. त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागले. त्या लोकांना भारतीयत्व दिलं जाणार आहे. 1955 साली नागरिकत्व विधेयक तयार करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी ते नीट लागू करण्यात आलं नाही. आताच्या सरकारने मात्र हिंमत दाखवून हा कायदा लागू केला. भारत देश ही धर्मशाळा नाही. कुणालाही बेकायदेशीरपणे या देशात राहाता येणार नाही. या कायद्यामुळे दहशतवादी घटनांना आळा बसणार आहे.

हा कायदा देशाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत. राज्यात किती लोक राहतात, याची संख्या आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यांना राजकारण करण्याचे स्वतंत्र्य आहे, मात्र सगळ्यांमध्ये राष्ट्रवाद असला पाहिजे. कोणत्याही धर्माचा नाही, तर संपूर्ण देशाचं भलं करण्यासाठी हा कायदा आहे, असे व्यास म्हणाले.

यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यात या कायद्याविषयी गैरसमज पसरविणार्‍यांवर, देशात अशांतता पसरवणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी टॅक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील मुथ्था, किरण लुणिया, नगरसेवक रवी पाटील, विजय ढोले, श्रेयस झिरंगे, कौषिक कुलकर्णी, दीपक चव्हाण, सतीश सौदागर, संजय यादव, अभिजीत कुलकर्णी, रुपेश हरकल, गणेश नवले आदींसह विविध हिंदुत्ववादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅली दरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. यासाठी दंगल नियंत्रक पथक, अहमदनगर पोलीस व स्थानिक पोलीस असे एकूण 80 ते 85 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या