Tuesday, April 23, 2024
Homeनाशिक‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे : कृषीमंत्री दादाजी भुसे

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे : कृषीमंत्री दादाजी भुसे

मालेगाव :

‘कोरोना’ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले.

- Advertisement -

मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत आज दुपारी महसूल, पोलिस, महानगरपालिका प्रशासनाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, सहाय्यक उपायुक्त राहुल मर्ढेकर आदी उपस्थित होते.

मंत्री भुसे यांनी सांगितले, ‘कोरोना’ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. ‘कोरोना’ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शहरात गर्दी करू नये. परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती तत्काळ प्रशासनास द्यावी. रविवारी म्हणजेच 22 मार्च रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

उपविभागीय अधिकारी डॉ. शर्मा यांनी सांगितले, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशान्वये शहरातील गर्दी होणारे हॉटेल, लॉन्स, मंगल कार्यालये, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी चहाची हॉटेल, चित्रपटगृहे आदी सर्व ठिकाणी बंद करण्यात येणार आहेत. वरील ठिकाणी निरीक्षणासाठी भरारी पथकांची नेमूणक करण्यात येणार आहे. या पथकात पाच ते सहा जणांचा समावेश असेल. मालेगाव शहरातील सर्व पान दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. नागरिकांनी नियमांचे उल्लघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुरु असलेले सेतू केद्रही बंद करण्यात आले आहे.

मालेगाव शहरात व बाहेरील देशातून एकूण 42 व ग्रामीण भागात 4 प्रवासी आलेले आहेत त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. त्यांना 14 दिवस घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आलेला आहेत. त्यातील काही संशयित प्रवासी बाहेर फिरताना आढल्यास त्यांना येथील विलगीकरण कक्षात दाखल करून कारवाई करण्यात येईल. संशयित रुग्णांना विलगीकरणाचा शिक्का आज सायंकाळ पर्यत उपलब्ध होईल. त्याचा वापर उद्यापासून करण्यात येईल, असे महानगरपालिकेचे आयुक्त बोर्डे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या