तयारी एसएसबीची
Featured

तयारी एसएसबीची

Sarvmat Digital

भारतीय सशस्त्र सैनिकी अधिकारी वर्गात जाण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला सेवा निवड मंडळ (एसएसबी) ची मुलाखत आणि परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. ही परीक्षा पाच दिवसांची असते आणि त्यात दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात ऑफिसर इंटिलिजन्स रेटिंग (ओआयआर) टेस्ट, तसेच पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट (पीपी अँड डीटी) चा समावेश होतो. पहिला टप्पा पार केल्यानंतर उमेदवार दुसर्‍या टप्प्याकडे वाटचाल करतात. दुसर्‍या टप्प्यात मानसशास्त्रीय चाचणी, मुलाखत आणि ग्रुप टेस्टिंग ऑफिसर-जीटीओ याचा समावेश असतो. एसएसबीचे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांकडे रणनिती दृष्टीकोन, निवडीमागचा उद्देश याचे योग्य आकलन आणि संरक्षण क्षेत्रातील बारकावे जाणण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.

परीक्षेचे विविध टप्पे – पाच दिवसाच्या मॅराथॉन परीक्षेचा प्रारंभ हा ओआयआर टेस्टने होतो. या परीक्षेतील सर्व उमेदवारांना एक ते पाच अंक दिले जातात. ही रेटिंग उमेदवार पुढे जाणार की नाही, हे निश्‍चित करते. व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रीजनिंगचा नियमित अभ्यास हा या परीक्षेसाठी अत्यावश्यक मानला जातो. त्याचवेळी पीपीअँडडीटी परीक्षेत उमेदवारांच्या स्टोरी ड्राफ्टींग स्किलला एका मिनिटात ओळखले जाते. या परीक्षेत उमेदवाराचे कौशल्य, नेतृत्वगुण तपासले जाते. एखाद्या संकटकाळात घेण्यात येणार्‍या निर्णयाची चाचपणी केली जाते. सकारात्मक विचाराची गुणात्मकता पारखली जाते. तसेच उमेदवाराच्या कहानीचा विषय हा सामाजिक रुपाने उपयुक्त असायला हवा. त्यानंतर ग्रुप डिक्सशनदरम्यान उमेदवाराला आपले विचार स्पष्टपणे मांडावे लागतात. चर्चेच्या वेळी आरडाओरडा न करता शांतपणे आपले मुद्दे मांडावेत. अन्य उमेदवाराचे म्हणणे ऐकूण आपली बाजू मांडावी. त्याचबरोबर गटातील अन्य सदस्यांच्या सूचनांचे नम्रतेने पालन करावे.

सायकॉलॉजिकल टेस्ट – सायकॉलॉजिकल चाचणीच्या माध्यमातून उमेदवाराच्या मानसशास्त्रीय दृष्टीकोनाचे आकलन केले जाते. यादरम्यान तणावाच्या काळात, अडचणीच्या स्थितीत उमेदवाराची प्रतिक्रिया तपासली जाते. यात टीएटी, डब्ल्यूएटी, एसआरटी तसेच एसडी यासारख्या चाचणीचा समावेश होतो. ही चाचणी उमेदवाराची अवचेतन आणि अचेतन स्थिती तपासणारी असते. ही चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला चांगल्या सवयी आणि आवड असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अपयश पचवण्याची क्षमताही अंगी असणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोणत्याही संकटाला, भयाचा सामना करण्याची शक्ती उमेदवाराकडे असावी लागते. लेखनाची गती चांगली असणे अपेक्षित आहे. यासाठी आपल्याला कहानी लेखनाची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. उमेदवाराच्या प्रतिक्रियेत उच्च सामाजिक समतोलपणा, त्वरीत निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्वगुण असणे आवश्यक आहे.

वैयक्तिक मुलाखत – सेल्फ इंट्रोडेक्शनची चांगली तयारी करावी आणि आपला परिचय अचूकपणे सादर करावा. सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रॅपिड फायरदरम्यान सजग असणे गरजेचे आहे. प्रश्‍नांकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन त्याचे उत्तर द्यावे. यात आत्मविश्‍वास आणि संयमाची परीक्षा पाहिली जाते. या परीक्षेतील 95 टक्के प्रश्‍न हे सामान्य ज्ञानाशी निगडीत असतात. त्यामुळे वर्ष किंवा सहा महिन्यातील घडामोडींचे चांगल्या रितीने आकलन करावे. करंट अफेअर्स, संरक्षणासंबंधीचे ज्ञान, राष्ट्री-आंतरराष्ट्रीय
मुद्द्याचे आकलन करावे.

जीओटीची रणनिती – सामाजिक ताळमेळ हा या निवडप्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. या निकषाला चाचणीत महत्त्व दिले गेले आहे. आपले लक्ष्य संपूर्णपणे गटातील ध्येयाकडे असावे. व्यक्तिगत भूमिका बाजूला ठेवावी. आपला विचार मांडण्यापूर्वी चर्चा करावी आणि प्रभावीपणे मुद्दा मांडावा. स्वत:ला किचकट मुदद्यात अडकून घेऊ नये. मुलाखतीत साहस आणि सहकार्य हा सर्वात मोठा गुण मानला जातो. समुह चर्चेत दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या.दुसर्‍यांचे म्हणणे शांतपणे ऐकल्यानंतरच आपले म्हणणे मांडावे. गटचर्चेत आपली बाजू मांडण्यासाठी आपल्याला अनेक संधी मिळते.

Deshdoot
www.deshdoot.com