दूध संघावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द
Featured

दूध संघावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील जिल्हा, तालुका दूध उत्पादक संघावर नियुक्त केलेल्या अशासकीय सदस्यांचा नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी, पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास विभागाने घेतला आहे. राज्यात अशा प्रकारे 26 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात नगर जिल्ह्यातील चार जणांचा समावेश आहे.

राज्याचे कृषी, पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास विभागाचे अवर सचिव राजेश गोविल यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी काढले आहेत. राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 76 अ चे पोटकलम (2) नूसार व सहकार पणन विभागाच्या 2018 च्या सुधारणानूसार सरकारचे भागभांडवल, कर्ज, हमी, अनुदान, शासकीय जमीन या स्वरूपात अथवा सरकारकडून कोणत्याही स्वरूपात अनुदान मिळणार गृहनिर्माण संस्था वगळून अन्य संस्थांवर अशासकीय सदस्य नेमण्याचे अधिकार होते. त्यानूसार राज्यातील विविध जिल्हास्तरीय दूध संघ आणि तालुकास्तरीय दूध संघावर अशासकीय सदस्यांना नेमण्यात आले होते. त्यांच्या नियुक्त्या राज्य सरकारने रद्द केल्या आहेत.

यात संगमनेर तालुका दूध संघावरील प्रविण रबाजी खेमनर (संगमनेर), गोदावरी खोरे नामदेवराव परजणे दूध संघावरील योगेश विठ्ठलराव नरोडे (कोपरगाव), राहाता तालुका सहकारी दूध संघावरील उमेश दामू काटकर (राहाता) आणि श्रीरामपूर दूध संघावरील नानासाहेब पंढरीनाथ जुंधारे (रा. मांजरी, ता. राहुरी) यांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com