कोरोना पर कुछ तो भी ‘करो’ना !
Featured

कोरोना पर कुछ तो भी ‘करो’ना !

Rajendra Patil

बाळासाहेब पाटील
पारोळा – वार्तापत्र

तालुक्यात लग्नाच्या धामधुमीची गर्दी असतांना आनंदी वातावरणात ‘कोरोना’च्या भितीने नवरदेव-नवरीने एकमेकांचे हातात हात घ्यावेत की नाही अशा कोरोनाने जनमन विस्कळीत करून टाकलेत. त्यात मांसाहारींवर मोठं संकट कोसळलं तर कोंबड्या-बकर्‍यांमध्ये तात्पुरता आनंद वाटत असेल असं गृहीत धरल तरी कुक्कुट व शेळी पालन करणार्‍यांचे काय हाल होत आहेत हे दृश्य पाहुन आर्थिक फटक्याने त्यांना जोरदार झटका बसत असल्याने नको हा ‘कोरोना’ यासाठी कुछ तो भी ‘करो’ना असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या रोगांना-आजारांना कोण-कोण जबाबदार असा प्रश्न कुणी विचारला तर त्याला उत्तर ‘आपणच’!

रोग-आजार कुणामुळे?

तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून भरपूर रोग-आजार आले अन् गेले त्यात त्याच रोग-आजारांनी बरेच जण यमसदनी रवाना देखील झालेत. त्या रोग आजारांची लक्षणं ‘कोरोना’ शी मिळते-जुळतेच, ‘कोरोना’ पेक्षाही भयान होते पण ‘लक्षात कोण घेतो’ ही म्हणण्याची आपली परंपराच ना? ‘कोरोना’ देखील आपल्याकडील आजारांसारखाच असल्याचे दिसतो.

थंडी, ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला यापेक्षा ‘कोरोना’ वेगळाच काही वाटत नाही. या ‘कोरोना’ बाबत व्हाट्सअ‍ॅपवर सतत उपचार सुचविले जात आहेत. तर काही बाबींमधून ‘अफवा’ देखील पसरविल्या जात आहेत. हे तर चालायचेच; अफवा हा अधर्म असला तरी तो धर्म म्हणून पाळला जातो ना?

‘करा अन् मरा’

शेतकर्‍यांचा शेती प्रधान तालुक्याची परिस्थिती नाजूक झाली असून चांगलं ते कळतं पण कुणी वळत नाही; पिकं लवकर अन् मुबलक प्रमाणात आली पाहिजे म्हणून धोका पत्करून शेती करायची काय? असं मत अनेक जाणकार तज्ज्ञांनी मांडले आहे. रासायनिक खते अन् फवारणीमुळे अन्न-धान्य, भाजीपाला फळे ही सारी पिकविण्याची पध्दती आपल्या नाशाला कारणीभूत असून सेंद्रीय शेतीकडे आपण वळलो नाहीत तर पुढची पिढी लुळी-पांगळी, कमकुवत, बुध्दीहीन पाहायची काय? असं मत किर्तनकार-प्रवचनकार नेहमी मांडत असतात, पण लक्षात कोण घेतो.

तालुक्याचे आरोग्य रक्षक कोण?

पारोळा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागाचे आरोग्य रक्षक कोण? असे जर कुणी विचारले तर कुणीही सहज नगरपालिका मुख्याधिकारी व गटविकासाधिकारी, पण याच बरोबर या तालुक्यातील शहरी अन् ग्रामीण भागात प्रत्येक जण हा ‘आरोग्य रक्षक’ आहेच.

पण यात प्रशासनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून प्रशासकीय अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा-बळाचा वापर कुणाचाही मुलाहिजा न ठेवता केल्यास ‘कोरोना’ सारख्या आजारांना तालुक्यात शिरकाव करता येणार नाही. मुख्याधिकारी मुंढेंचे बर्‍याच बाबींकडे लक्ष दिसून येते, पण शहराच्या आरोग्य रक्षणाकडे लक्ष दिल्यास हागणदारी अस्वच्छतेकडे लक्ष दिलेच पाहिजे.

गेल्या दहा वर्षापासून सतत पुरस्कार, सन्मानपत्र बक्षीसे मिळवून पाठ थोपटून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती काय? हे देखील पाहणे गरजेचे वाटत नसावे काय? ग्रामीण भागाची परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. हागणदारी-अस्वच्छता या बाबींकडे गटविकाधिकारी सतत दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी वाढत असल्या तरी त्या निवारण्याची क्षमता असून त्या क्षमतेचा वापर होत नसल्याने जि.प. सी.ओ.साहेबांनी लक्ष घालण्याची गरज आहे, अन्यथा रोग-आजारांना सामोरे जावेच लागेल ना?

दिनांचे महत्त्व किती?

गेल्या पंधरवाड्यात शिवजयंती, महिला दिन मोठ्या उत्साहात पार पाडले गेलेत. दरवर्षी अनेक दिन साजरे होतात. असा कोणताच ‘दिन’ राहिला नाही की तो साजरा झालाच नाही. पण तो दिन आपल्या पचनीच पडत नाही याचे कारण कुणी शोधत नाही अन् शोधले देखील जाणार नाही, येणारा ‘दिन’ हा फक्त त्या दिवशी साजरा करायचा असतो पण त्या दिनाचे महत्त्व कायम असावे त्या थोर पुरूषांच्या, महिलांच्या सन्मानाबरोबर त्यांच्या आचार-विचारांची डोक्यावर नव्हे डोक्यात घेऊन अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

बालदिन साजरा केला जातो, बालकांना शालेय शिक्षणाची गरज असतात तेच बालक बालदिनी सुध्दा बालकामगार म्हणून कामावर असतात हे कुणाच्या डोक्यात आहे का? या दिनाला दीनपणा येऊ नये, आपल्या तालुक्यात ‘कोरोना’च काय पण कुठलेही रोग-आजार होऊ नयेत लोकप्रतिनिधी-पदाधिकारी व प्रशासकीय अधिकार्‍यांनी याची जाण ठेवावी हीच अपेक्षा.

मो.नं.9423190457

Deshdoot
www.deshdoot.com