नंदुरबार जि.प.अध्यक्षपदी काँग्रेसच्या सीमा वळवी तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲड.राम रघुवंशी यांची निवड

jalgaon-digital
4 Min Read

नंदुरबार | प्रतिनिधी

येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या सीमा पद्माकर वळवी यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेवर कोणाची  सत्ता येईल याबाबत सस्पेन्स कायम असतांना अखेरच्या दिवशी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे भाजपाने सीमा वळवी यांना बिनशर्त पाठींबा दिल्याने त्यांना पूर्ण म्हणजे ५६ मते मिळाली तर ॲड.राम रघुवंशी यांना ३० मते मिळाली.

येथील जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात कॉंग्रेस व भाजपाला प्रत्येकी २३ जागा मिळाल्या तर शिवसेनेला सात व राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या. मात्र, सत्ता स्थापनेसाठी २९ जागांची आवश्यकता असल्याने शिवसेनेच्या पाठींब्याशिवाय कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता येणार नव्हती. त्यामुळे शिवसेना कोणाला पाठींबा देते याबाबत अखेरच्या दिवसापर्यंत खलबते सुरु होती.

अखेर काल रात्री कॉंग्रेस नेते व शिवसेना नेत्यांची बैठक होवून सीमा पद्माकर वळवी यांना अध्यक्ष तर ॲड.राम रघुवंशी यांना उपाध्यक्ष पद देण्याचे निश्‍चीत झाले. तरीही आज दिवसभर याबाबत सस्पेन्स कायम होते. ११ वाजता अध्यक्ष,  उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून ऍड.सीमा पद्माकर वळवी, अजित सुरुपसिंग नाईक, भाजपाकडून डॉ.सौ.कुमुदिनी विजयकुमार गावित, अर्चना शरद गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून ऍड.राम रघुवंशी, जयश्री दीपक पाटील, विजया प्रकाश गावित, अर्चना शरद गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, माघारीच्या मुदतीत कॉंग्रेसचे अजित नाईक, भाजपाच्या अर्चना गावित यांनी तर उपाध्यक्षपदासाठी विजया प्रकाश गावित व अर्चना शरद गावित यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी सीमा वळवी व डॉ.सौ.कुमुदिनी गावित तर उपाध्यक्षपदासाठी ऍड.राम रघुवंशी व जयश्री पाटील यांच्यात सरळ लढत झाली.

दरम्यान, अध्यक्षपदाची निवड होण्यापुर्वी भाजपाच्या उमेदवारी डॉ.सौ.कुमुदिनी गावित यांनी आमचा कॉंग्रेस उमेदवारी सीमा वळवी यांना बिनशर्त पाठींबा असल्याने ही निवड बिनविरोध करावी, अशी मागणी केली. परंतू माघारीची मुदत संपलेली असल्याने निवड प्रक्रिया घ्यावी लागेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केल्याने मतदान घेण्यात आली. यात सीमा वळवी यांना भाजपा, कॉंग्रेसचे प्रत्येकी २३, शिवसेनेचे ७ व राष्ट्रवादीचे ३ असे संपूर्ण ५६ मत मिळाले. तर डॉ.कुमुदिनी गावित यांना शून्य मते मिळाली. त्यामुळे सीमा वळवी या ५६ विरुद्ध ० मतांनी विजयी झाल्या.

उपाध्यक्षपदाची निवड मात्र भाजपाने शिवसेनेचे ॲड.राम रघुवंशी यांच्याविरोधात मतदान केले. त्यामुळे ॲड.रघुवंशी यांना कॉंग्रेसचे २३ व शिवसेनेचे ७ अशी ३० मते मिळाली. तर भाजपाच्या सौ.जयश्री पाटील यांना भाजपाची २३ व राष्ट्रवादीचे ३ असे २६ मत मिळाले. त्यामुळे ॲड. रघुवंशी हे ३० विरुद्ध २६ मतांनी विजयी झाले.

अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड होताच जिल्हा परिषदेबाहेर समर्थकांनी जल्लोष केला. निवडीनंतर बोलतांना नवनिर्वाचित जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी म्हणाल्या, मला जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी बिनशर्त पाठींबा देवून निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. भाजपाच्या डॉ.सौ.कुमुदिनी गावित यांनीदेखील मला पाठींबा दिल्याने त्यांचेही आभार. येत्या पाच वर्षात जिल्हा परिषदेमार्फत विकास कामांना चालना देण्यात येईल. तळागाळातील लोकापर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व योजना पोहचविण्याचा प्रयत्न केला जाईल. आज ज्याप्रमाणे मला सर्वांनी एकत्रितरित्या पाठींबा दिला तसाच पाठींबा पूर्ण पाच वर्षात सर्वांकडून मिळेल, अशी अपेक्षा!

यावेळी जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी म्हणाले, मला जि.प.उपाधक्षपदी निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आज ज्याप्रमाणे शांततेत आणि सहयोगाने निवड प्रक्रिया राबविली तसेच सौहार्दाचे वातावरण आगामी पाच वर्षातही असू द्यावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *