जळगाव : नागरिकांनी ‘आरोग्य सेतू’ ॲप डाऊनलोड करा – जिल्हाधिकारी
Featured

जळगाव : नागरिकांनी ‘आरोग्य सेतू’ ॲप डाऊनलोड करा – जिल्हाधिकारी

Rajendra Patil

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत आहे. त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने ‘आरोग्य सेतू’ हे ॲप तयार केले आहे. या ॲपमध्ये करोना विषाणू अनुषंगाने सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

करोना विषाणू बाधितांच्या ट्रेसिंगसाठी महत्वाचे ॲप असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषत: स्मार्टफोन धारकांनी हे ॲप डाऊनलोड करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

या ॲपद्वारे ॲप डाउनलोड करणारा व्यक्ती कोरोना बाधित असलेल्या किती लोकांच्या संपर्कात आला या विषयाची माहिती मिळते तसेच ॲप डाऊनलोड करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला तर या व्यक्तीच्या संपर्कात कोण कोण आले याची सर्व माहिती या ॲपद्वारे मिळते.

हे ॲप सुरुवातीला डाऊनलोड करणाऱ्याचे आरोग्यविषयक तपासणी करते. आरोग्य विषयक विशेषत: कोरोना विषयक काही प्रश्न विचारले जातात त्याच्या उत्तरांना आपल्याला चूक की बरोबर उत्तरावर टिक करावे लागते. तसेच ॲपमध्ये सामाजिक अंतर कशा पद्धतीने ठेवायचे, हात कशा पद्धतीने धुवायचे, तोंडावर रुमाल कशा पद्धतीने लावायचा याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

सदर ॲप प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करता येते. आरोग्य सेतू हे ॲप कोरोना प्रतिबंधासाठी व ट्रेसिंगसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तरी याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com