जळगाव : जन-धन बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी गर्दी करू नका, अन्यथा होणार पोलीस कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
Featured

जळगाव : जन-धन बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी गर्दी करू नका, अन्यथा होणार पोलीस कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Rajendra Patil

ठरवून दिलेल्या विेळापत्रकाचा वापर करा

जळगाव – (जिमाका वृत्तसेवा)

‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज’च्या माध्यमातून जन- धन योजनेंतर्गत खाते असलेल्या महिल्यांच्या खात्यावर 500 रुपये प्रति महिना या प्रमाणे पुढील तीन महिन्यांसाठी पैसे जमा केले जाणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी महिलांनी ‘सोशल डिस्टन्स’चा वापर करीत ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकार्य करीत बँकेत गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी म्हटले आहे, महिलांच्या जन-धन खात्यात पहिल्या टप्यातील 500 रुपये जमा झाले आहेत. ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांनी घाई करू नये. पैसे बँकेत सुरक्षित आहेत. खातेदार त्यांच्या सोयीनुसार पैसे काढू शकतात. मात्र, जे लाभार्थी तातडीने पैसे काढू इच्छित असतील त्यांनी वेळापत्रकानुसार पैसे काढावेत.

तसेच ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्स’चा वापर करावा. तसेच पैसे काढण्यासाठी बँक मित्र किंवा ग्राहक सेवा केंद्राचा (CSP) उपयोग करता येईल. सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या एटीएमचा वापर करावा. ‘कोरोना’ विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता महत्वाची आहे, त्यामुळे बँकेत गर्दी करू नये.

असे असेल वेळापत्रक

या वेळापत्रकानुसार 3 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक शून्य किंवा एक आहे त्यांनी पैसे काढावेत. दि.4 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक दोन किंवा तीन आहे त्यांनी पैसे काढावेत. 7 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक चार किंवा पाच आहे त्यांनी पैसे काढण्यासाठी यावे. 8 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा क्रमांक 6 किंवा 7 आहे त्यांनी पैसे काढण्यासाठी यावे. 9 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक 8 किंवा 9 आहे त्यांनी पैसे काढण्यासाठी यावे.

तसेच बँकेत योग्य अंतर राखून पैसे काढण्यासाठी थांबावे, ठरवून दिलेल्या अंकाव्यतिरिक्त इतर कोणीही बॅकींग कामासाठी अनावश्यक बाहेर आढळल्यास त्यांचेवर पोलीस विभागाचे सक्त कारवाई करावी. असेही जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com