Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगावात आरोग्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची गर्दी ; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

जळगावात आरोग्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची गर्दी ; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

जळगाव –

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

- Advertisement -

यावेळी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाची देखील चांगलीच कसरत करावी लागली. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे बुधवारी जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यात सकाळी 9 वाजेपासून जिल्हा रुग्णालयाला भेट, शहरातील कंटेन्मेंट झोनची पाहणी त्यानंतर आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक असे नियोजन आहे.

परंतु, मंत्री टोपे हे तब्बल दीड तास उशिराने जळगावात दाखल झाले. अजिंठा विश्रामगृहात त्यांच्या स्वागतासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र, त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने गोंधळ उडाला.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने अनेक संघटना व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील निवेदने देण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी गर्दी पांगवताना पोलिसांची कसरत झाली. अनेकांनी पोलिसांशी हुज्जत देखील घातली.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अजिंठा विश्रामगृहात दाखल होणारे प्रत्येक अधिकारी तसेच व्यक्तीची स्क्रिनिंग करण्यासाठी तसेच हाताला सॅनिटायझर लावण्यासाठी आरोग्य विभागाकडून कर्मचारी नियुक्त केलेले होते. पण गर्दीतील नागरिकांना त्याचेही गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या