धुळे : लॉकडाऊन’ची अफवाच ; जिल्हाधिकारी संजय यादव

करोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी

धुळे – प्रतिनिधी
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतानाच जनजीवन सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत.

कन्टेन्मेन्ट झोन वगळता अन्य भागातील दुकाने सम- विषम पध्दतीने सुरू झाली आहेत. अशा परिस्थितीत समाजमाध्यमांवर विशेषत: व्हॉटसॲपवर फिरणाऱ्या ‘पुन्हा लॉकडाऊन’च्या संदेशाकडे पूर्णत: दुर्लक्ष करून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त, नियमितपणे मास्कचा वापर, योग्य शारीरिक अंतर ठेवावे, सॅनेटायझरचा नियमितपणे वापर आणि वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी म्हटले आहे, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. त्यासोबतच जनजीवन सुरळीत होण्यासाठी पाच जून 2020 पासून विविध व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन जनजीवन सुरळीत होण्यास मदत होत आहे.

मात्र, काल (दि.11) दुपारपासून व्हॉट्सॲपवर ‘पुन्हा लॉकडाऊन’ होणार असल्याचा संदेश फिरत आहे. तो निराधार आहे. सद्य:स्थितीत असा कोणताही निर्णय केंद्र सरकार किंवा राज्य शासन यांनी अद्याप घेतलेला नाही व धुळे जिल्हा प्रशासन याबाबत वेळोवेळी व्यापारी लोकप्रतिनिधी व नागरिकांचे मिळणारे सहकार्य व उदभवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. असा कोणताही बदल करावयाचा असल्यास ते अधिकृतरित्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विविध माध्यमाकडे प्रसिद्धीसाठी देण्यात येतील.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, व कोरोना विरुद्धच्या लढ्यात सर्वांनी शासनाच्या सूचना पाळून जिल्हा प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी केले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *