दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी साधणार शिक्षकांशी ऑनलाईन संवाद
Featured

दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी साधणार शिक्षकांशी ऑनलाईन संवाद

Rajendra Patil

भुसावळ –

दहावी पुनर्रचित अभ्यासक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी हे जळगाव जिल्ह्यातील दहावीला मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांशी झूम ॲपद्वारे संवाद साधणार आहेत. येत्या सोमवार दि. 8 जून 2020 पासून हे ऑनलाईन संवाद सत्र दररोज सकाळी 11 वाजता होईल.

दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ व कविता यांचे लेखन करणाऱ्या लेखक व कवींशी प्रत्यक्ष संवाद साधून हा पाठ अथवा कविता लिहिण्यामागची भूमिका जाणून घेण्यासाठी थेट संवाद आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील भुसावळ, वंदना भिरूड भुसावळ, दिलीप वैद्य रावेर, निर्मल चतुर यावल, संजय ठाकूर मुक्ताईनगर, व्ही.एन. पाटील जामनेर, दीपक चौधरी बोदवड, किशोर चौधरी मुक्ताईनगर यांनी पुढाकार घेतला आहे.

त्याकरिता पाठाचे लेखक व कवींशी थेट मोबाईलवर संपर्क साधण्यात आला असून त्यांची वेळ घेण्यात आली आहे. झूम ॲपद्वारे ते शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहे. येत्या सोमवार दि.8 जून 2020 पासून दररोज सकाळी 11 वाजता संवाद सत्र सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्य अधिकाधिक विकसित होण्यासाठी त्यांच्या भावविश्वाशी संबंधित पाठ, कविता, गीत, कृती, स्वाध्याय व चित्रे पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत.

पाठ व कविता लेखनामागची भूमिका, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी, शिक्षक समृद्धीसाठी आवश्यक क्षमता यासोबतच विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यांना कशी संधी देता येईल यासंदर्भात थेट लेखक-कवी मराठी विषय शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com