भुसावळ : गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले फेसशिल्ड

भुसावळ : गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले फेसशिल्ड

भुसावळ –

एकीकडे देशभर कोरोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील रोबोटिक्समधील विश्वविख्यात ब्लँका बॉट्स संघाने कोरोनाबाधित व संशयित व्यक्तींशी संपर्क येणार्‍या व्यक्तींसाठी फेस शिल्ड बनवले आहे. त्यामुळे कोरोनाचे विषाणू संबंधित व्यक्तीपर्यंत पोहचु शकणार नाही.

येथील एसएसजीबी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या अक्षय जोशी, भूषण गोर्धे, विनय चौधरी, शाहबाझ गवळी, रोहित चौधरी, शुभम झांबरे यांच्यासह ४० विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरणार्‍या आणि थेट कोरोनाबाधित व संशयित व्यक्तींशी संपर्क येणार्‍या व्यक्तींसाठी फेस शिल्ड बनवले आहे.

यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.नितीन खंडारे, प्रा.धिरज पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व डिवायएसपी गजानन राठोड यांनी भावी अभियंत्यांच्या कोरोना विरोधात सुरू असलेल्या लढ्यात सहभागी होऊन योगदान देण्याच्या कार्याचे कौतुक केले.संस्थाध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा, कोषाध्यक्ष महेश दत्त तिवारी व संस्था पदाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कमी खर्चात दीर्घकाळ टिकणार:
हे शिल्ड कमीत कमी खर्चात आणि दिवसात बनवले आहे. हा फेसशिल्ड वजनाने हलका असून दीर्घ काळ याचा वापर करता येऊ शकतो.

हे फेसशिल्ड बायोडीग्रेडेबल आहेत. दररोज ५० फेसशिल्ड तयार करण्यात येत आहेत. हे शिल्ड पोलीस, डॉक्टर आणि वैद्यकीय सहाय्यकांना उपयुक्त ठरणार आहे म्हणून सुरुवातीला विभागीय पोलीस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पोलिसांना वाटप करण्यात आले.

संपूर्ण चेहर्‍याचे होणार संरक्षण- मास्कने फक्त तोंडाला संरक्षण मिळते. त्यामुळे बाकी चेहर्‍याच्या भागाला संरक्षण मिळावे म्हणून फेस शिल्ड बनवण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण चेहर्‍याचे संरक्षण होणार आहे असे ब्लँका बॉट्स संघाचा संघनायक अक्षय जोशी याने सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com