ब्रेक निकामी झाल्याने नेवासाफाटा येथे बस जीपवर धडकली
Featured

ब्रेक निकामी झाल्याने नेवासाफाटा येथे बस जीपवर धडकली

Sarvmat Digital

सुदैवाने मोठा अपघात टळला, प्रवासी किरकोळ जखमी; जीपची मोडतोड

नेवासाफाटा (प्रतिनिधी)- नेवासाफाटा येथे काल सोमवारी सकाळी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने एक भीषण अपघात होता होता वाचला. यात काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

याबाबत माहिती अशी की, नेवासा फाटा येथे काल सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नेवासा-शेवगाव या एसटी बसचे ब्रेक नादुरुस्त झाले. बस (एमएच 14 बीटी 0781) नेवासाफाटा येथील डॉ. आबेडकर चौकात आली असता ब्रेक निकामी झाल्याने काळ्या पिवळ्या जीपला (एमएच 17 एजी 1346) जोराची धडक दिली.

यामध्ये जिप एका मोठ्या जाहिरात फलकाला डकली. त्यामुळे बसचा वेग कमी होऊन ती थांबली. सुदैवाने बसमध्ये चालक-वाहकांशिवाय केवळ पाच ते सहा प्रवाशी होते. त्यांना किरकोळ इजा झाली. त्यांना जवळच्याच दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात येऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नेहमी गर्दी असणारा हा चौक असला तरी सकाळी रोडवर वर्दळ कमी होती त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवीतहानी वाचली.

घटना घडताच मोठी गर्दी जमा झाली होती. नेवासा पोलीस व एसटी डेपोला अपघाताची खबर देण्यात आली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला काढली. जीवितहानी टळली असली तरी अपघातात प्रवासी वाहतूक जीपचे मोठे नुकसान झाले.

Deshdoot
www.deshdoot.com