Blog : महिला दिन; आजची इंदिरा..

jalgaon-digital
8 Min Read

बहिरोबावाडीचे अनेक लोक इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकत असतात. सालभर दुसर्‍याच्या गावात राबल्यावर स्वतःच्या घरला परतायचे म्हणजे बहिरोबाची जत्रा. त्याच्यासाठी तेच सुखाचे चार दिवस. जशी जशी जत्रा जवळ येते तसे इथले लोक झिंगायला लागतात. गावात सार्वजनिक पाण्याचे नळ कमी अन दारूचे गुत्ते जादा. त्यामुळे दिवसा बायकांची पाण्याच्या नळावर झोंबाझोंबी अन रातच्याला दारुच्या गुत्यावरं गड्यांची गचांडागचांडी. मग जत्राच्या काळात तर इचारायला नको. तालुक्याच्या बसस्टॅडला झुलणार्‍या लोकांची संख्या वाढली की दुसर्‍या गावचे लोक समजून घ्यायचे, बहिरोबावाडीची जत्रा जवळ आली. तर असं हे बहिरोबावाडी माझ्या मामाचं गाव.

बहिरोबाची जत्रा तिखटासाठी सार्‍या पंचक्रोशीत फेमस. लहानथोरासह बायाबापड्यांना जत्रेची लय उत्सुकता. त्यापायी शाळातली पोरं चार-चार दिवस शाळेला दांडी मारतेत. मला लहानपणी अण्णा (आजोबा) खांद्यावर बसवून सारी जत्रा फिरवायचे. मला त्यांच्या गुळगुळीत टक्कलीचं लय कौतुक वाटायच. जत्राची दुकान गावातून जाईपर्यत मी घरी जेवत नसायचो. तवा अण्णाकड गावचा कारभार होता. त्यामुळे पैस द्यायची गरज नव्हती. मग रोजच जिलाबी, गुडीशेव, भजे, रेवड्या मंदिरासमोरच्या चिंचेच्या खोडात बसून खायचो. मामा दरवर्षी न चुकता जत्रेला न्यायला यायचा. तेवढेच चार दिवस शाळेला सुट्टी मिळायची. रोज मिळणार्‍या मास्तरच्या धपाट्यापासून आराम भेटायचा. तेव्हा मला म्हातारी आणि वाघोबाची गोष्ट आठवायची. म्हातारी लेकीच्या गावाला जाऊन गुटगुटीत होऊन येती.

पण येताना भोपळ्यात बसून आल्यामुळे ती वाघोबापासून वाचते. पण माझ तसं नव्हत. मामाच्या गावाला जायचं गुटगुटीत व्हायचं हिकडं येवून मास्तरचे गुद्दे खायचे. त्यामुळे जत्रेची जिलेबी काही पचत नसायची. सालभर पुढच्या जत्रेची तारीख कॅलिडरीमध्ये चाळत बसायचो. जसा जसा मोठ होत होतो तसे घरच्यांनी जत्रेसाठी दिलेले पैसे कमी पडायचे. घरच्यांना माहीत न होता शाळा सुटल्यावर पार्टटाइम व्यवसाय करायला लागलो. आमच्या गावात देशी दारू पिणारे खुप मेंबर होते. तेव्हा इंग्लिश दारू कोणाला माहिती नव्हती. त्यामुळे रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या जमा करून विकायचो. रविवारी दिवसभर कोणाच्यातरी शेतात कापूस वेचायला जायचो. सिजननुसार करंज्या, लिंबोळ्या, चिंचा जमा करायाच्या अन आठवडी बाजारात विकायचो. असा माझा जत्रेच्या गल्ला जमायचा.

कोणीतरी उलटी केल्याचा आवाज आला. तसा एका बाईने शिव्याचा पट्टा सुरू केला. या गोंधळाने मी बालपणीच्या आठवणीतून बाहेर आलो. आजूबाजूला पाहिले तर दारूड्याने एका बाईच्या साडीवर उलटी केली होती. बहिरोबाडीला जाण्यासाठी बसस्टॅडवर येऊन मला एक तास झाला होता. आईने बहिरोबाला केव्हातरी नवस केला होता. तिचा नवस फेडण्याची कामगिरी माझ्यावर होती. बस यायला अजून एक तास बाकी होता. हळूहळू बहिरोबावाडीला जाणार्‍या प्रवाशांची गर्दी वाढली होती. फेरीवाले खाद्यपदार्थ विकण्यासाठी वेगवेगळ्या स्वरात ओरडून लोकांचे लक्ष त्याच्याकडे वेधत होते. चौकशी ऑफीसमधला साहेब नवीन बस आली की काहीतरी सांगत होता. त्याच बोलण मात्र कोणाला समजत नव्हत. पान किंवा तंबाखूचा मोठा तोबरा त्याचा तोंडात असावा.

काहीवेळाने त्याने बाजूच्या भिंतीवर पिंचकारी मारली. तसा भोंग्यातून पिचकारीचा आवाज ऐकायला आला. एसटीचा बोर्ड वाचता न येणार्‍या लोकांची मोठी पंचाईत झालती. समोरच्या फलकावर 30 ते 35 वयाचा एक तरूण होता. तो सरळ गर्दीत घुसायचा. अन बाहेर येताना सार्‍या गर्दीला बाजूला लोटत यायचा. मग चौकशी ऑफीसमधल्या साहेबाला चार-दोन शिव्या हासडायचा. बसमध्ये चढायला खोळंबा केला म्हणून दुसरे प्रवाशी ह्याला चार-दोन शिव्या द्यायचे. मी बराच वेळ त्याची गंमत बघत होतो. त्याला पाटी वाचता येत नसावी.

बहिरोबाचं मंदिर चार-पाचशे वर्षे पुराणं, मातर आता कस डिजीटल झालय? अस माझ्या शेजारी बसलेला एक माणूस दुसर्‍याला म्हणला. दोनवरीस आधी ज्यानी मंदिर बघितल असल त्याच्या बालाबी मंदिर ओळखू येणार नाय समोरच्याने सहमती दर्शवतली. तस बहिरूबा नवसाला पावणारा. त्याच्यामोर 33 कोटी देवाची फलटण फिकी हाय त्यांच्यातील तिसरा मध्येच बोलला. जत्रा असल्याने हे तिघं सोबत बाजाराला आले असावेत. तसं त्यांच्या हातात सामानाच्या दोन दोन पिशव्या होत्या. लहानपणी माहा आजा सांगायचा. कसलंही जहरीलं जनवार डसू दे, एकदा का बहिरुबामोर माणूस टाकला की, दुसर्‍या दिवसापतूर किलेरचं होणार पहिल्या माणसाने ऐसपैस बसत बहिरूबाची किर्ती सांगितली. उगाच गर्दी व्हतीय का लोकायची? त्यासनी इश्वास हाय दुसरा म्हणाला.

आज्याने सांगितल्यापासून जनवार दिसल कि म्या बहिरूबाच नाव घेतू, रानावनात भटकतू पण कवा दगाफटका झाला नाय बघ. पहिला केविलवाण तोंड करत म्हणाला. नाकातून बोट काढत तिसरा म्हणाला, होय, होय, तशी बहिरुबाची कीर्तीच हाय, ममई-पूण्यावरून नवस फेडाय लोक येत्यात. दरसाल बहिरूबाला तिखटाच्या निवदाचा मान हाय, पर यंदा काय बर नय दिसत गड्या. अन पहिल्यावाणी मजा पण येणार नाय दुसर्‍याने काळजीचा स्वर काढला. त्याचं बोलण मी कुतुहलाने ऐकत होतो. त्याच्यातील एकाने नाराजी व्यक्त केल्याने मीही चिंतेत पडलो.

तो अस का बोलला असेल याचा विचारात करत होतो. एकाने कोपरीतून तंबाखूचा बटवा बाहेर काढला. त्यातून चिमूटभर तंबाखूचा इडा तळहातावर घेतला अन चुना लावून रगडात म्हणाला, व्हय, काऊन मजा येणार नाय, तिच्या बाला भितो का काय? आता माझं पुर्ण लक्ष त्यांच्या बोलण्याकडे लागल होत. इतर लोकांची कलकल माझ्या कानापर्यत पोहचत नव्हती. हे तिघेही बहिरूबाच्या जत्रेबद्दल बोलत होते अन गावात काहीतरी नवीन घडलं असावं अशी त्यांच्या बोलण्यातून खात्री झाली.

मानवी स्वभावाप्रमाणे स्पष्ट ऐकायला येवा म्हणून जरा त्याच्याकडे सरकूण बसलो. तोंडासमोर पेपर धरला अन त्याच्या गप्पाकडे कान लावला. दुसर्‍याने पाहिल्याचा हातातून तंबाखूचा बटवा घेतला अन म्हणाला, सरपंच व्हायली म्हणजी काय वाघीण हाय काव, हिच्या आधी कोणी सरपंच नव्हतं काव तिसरा त्याच्या बोलण्याच समर्थन करत म्हणाला, पूर्वीपारची प्रथा हाय, बहिरोबाला बकर्‍याचा निवद लागतूया अन बाय म्हणती बकर्‍याचा बळी अंधश्रद्धा हाय पहिल्या माणसाचे डोळे लाल दिसत होते, तो म्हणाला, अन दारू काय हिच्या बाच्या पैक्याची पितू व्हयं.

जत्रात दारूबंदी कराय निघाली तेवढ्यात तंबाखूचा इडा तोंडात भरत पहिला माणूस म्हणाला, म्या पहिल्यापासून बोंबलत व्हतू, बाय नकू मंदिराच्या ट्रस्टवर, सरपंच झाली लय भूषाण झालय, तवा लय गावची रीत सांगत व्हती, सरपंचं ट्रस्टचा अध्यक्ष असतू म्हणून, आता भोगा कर्मची फळ असं बोलल्याने बाकीच्याच बोलणं बंद झाल. रावसाहेबाचा (तिचा नवरा) बी काय इलाज चालत नाय, त्यांचे सार्‍या गावातले बोर्ड बाईन उतरवलेत. त्यातला एकाने सरपंच बाईच अजून एक कर्तृत्व सांगितल. बहिरोबावाडीच्या सरपंचबाईचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. मागील महिन्यात इंदिरा गांधीचे मी इंदिरा हे पुस्तक मी वाचल होत. त्यामुळे मला बहिरोबावाडीची सरपंच पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीसारखीचं निडर आणि खंबीर वाटली.

तेवढ्यात सगळ्यांची पळापळ झाली. त्यांच्या गप्पा तिथच थांबल्या. बहिरोबावाडीला जाणारी बस आली होती. गर्दीत शिरताना ठरवल गावात जाऊन सरपंच बाईची भेट घ्यायची म्हणून. कॉलेजच्या पोरांनी खिडकीतून बॅगा टाकून बसमध्ये जागा धरल्या होत्या. शेवटची बस असल्याने मला गर्दीत शिरल्याशिवाय पर्याय नव्हता. चौकशी ऑफीसमधला साहेब बस आल्याचे पुकारत होता. पण कोणती बस आली हे मात्र समजत नव्हत. गर्दीत शिरून कशीतरी दरवाज्यात जागा भेटली. चिखल पायाने तुडवावा तसा माझा पाय तुडविला होता.

कपाळावरून निघालेला घामाचा वगळ थेट बेंबीपर्यत पोहचला होता. थोडही सरकता येत नव्हत. कुणाचं तरी लेकरू मोठ्यानं रडत होत. गर्दीत कुणाची तरी द्राक्षाची पिशवी पुटली असावी. तसा वास येत होता. मी इकडंतिकडं पहिल तर शेजाराचा माणूस खेकसला. कशाला वळवळ करतायओ पाव्हणं, गप उभा रहावा की तो खेकसला तसा भपका अधिक आला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. नवस फेडण्यासाठी आईने दिलेली सामानाची पिशवी स्टॅडवरच विसरून राहिली. बस बहिरोबावाडीच्या दिशेने सुसाट निघाली. सामान विसरून राहिल्याच दुःख वाटत नव्हत. पुस्तकात वाचलेली इंदिरा आता प्रत्यक्ष भेटणार असल्याने उत्सुकता होती.

– प्रशांत शिंदे
9673499181

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *