Blog : व्हॅलेंटाईनचे सिंगल मिंगल !
Featured

Blog : व्हॅलेंटाईनचे सिंगल मिंगल !

Sarvmat Digital

नुकतंच 4 फेब्रुवारीला फेसबुकचं सोळावं वरीस सरलं. एका अर्थाने फेसबुकही भलतंच वयात आलंय. आपल्याकडे सोळावं वरीस धोक्याचं मानलं जातं. मात्र सोळावं वरीस सरताना फेसबुकही सिंगल राहिलं नाही. काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्राम बरोबर त्याचं गॉटमॅट जुळलं. एरवी तुम्ही एखाद्या मुलीला मैत्रीचा प्रस्ताव दिला तर ती कबूल करल असं नाही. मात्र फेसबुकवर सहजासहजी मैत्रीण होते. यातून अनेक सिंगल मुलं मिंगल झाले. यंदा व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने यातील एका सिंगल अवलीयाने फेसबुकच्या संस्थापकाला (मार्क झुकरबर्ग) लिहिलेलं हे पत्र…

प्रिय झुकरभाऊ,

तुला खूप दिवसांपासून पत्र लिहायचं होतं. पण तसा योग जुळून येत नव्हता. हल्ली वेळच कुठं असतो रे माणसाला? मी लहान होतो तेव्हा शहरातून गावात सुट्टीला येणारी माणसं फुशारकी मारत सांगायचे, अहो! हल्ली वेळच मिळत नाही कामातून… त्यामुळे कधीमधी येतो गावी . तेव्हा मला त्यांचा लय राग यायचा बघ. किती खोटं बोलतात हे असं वाटायचं. पण आता राग नाही येत. फेसबुक वापरायला लागल्यापासून असं बोलणार्‍याची कीव येते रे. हल्ली प्रत्येकजण किती बिझी असतो. बघ ना, तुला पत्र लिहायची मनापासून इच्छा होती पण वेळ नसायचा. रोज फ्रीमध्ये मिळणार दीड जीबी नेट वाया कसं जाऊ द्यायचं?

तसं बी तू आंतरज्ञानी हाय. कोण काय पाहतं, कोणाची काय आवडनिवड, कोण काय काय वाचतं हे सगळं तुला ठाऊक हायंच की. तुला सांगतो, लहानपणी आय सांगायची खोटं बोलू नये, चोरी करू नये, वाईट बोलू नये असं बरंच काही सांगायची. म्या एकदा तिला म्हणलो, तू हे सगळं नेहमी नेहमी का सांगतेस? तर ती म्हणली, आपल्या वागण्यावर देवाचं लक्ष असतं. तुला सांगतो, तेव्हापासून कानाला खडा लावला. चोरी, लबाडी कधींच केली नाही. पण मोठं झाल्यावर समजलं देवफिव काय नसतं म्हणून. मला चांगलं वळण लागावं म्हणून आय खोटं सांगायची. पण तिचं खोटं बोलणं माझ्यासाठी चांगलं व्हतं. नाहीतर मी वाईट वळणाला लागलो असतो. जाऊ दे, आपला विषय वेगळा होता अन् मी दुसरंच सांगत बसलो.

अरे देवा! तुला पत्राचा विषयच अजून सांगितला नाही. तुझ्यापासून काय लपवणार म्हणा. मला माझ्याबद्दल जेवढं माहीत नाही तेवढं तुला माहितीय बघ. मला कोण आवडतं? मी काय विचार करतो? कधी उठतो? कधी झोपतो? काय खातो? तुला सारे गुपितं ठाऊक हायती. तर पत्राचा विषय असा होता की, 14 फेब्रुवारी आलाय. तो दिवस म्हणजे आम्हा तरुणाईसाठी दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस सगळं असतं बघ. तू विचार करशील हे तुला का सांगतोय? तुझं पण ते बरोबर हाय. खरं सांगू, तू आमच्यासाठी 21 शतकातला लव्ह गुरू हायेस. तुला हसायला येईल पण हायेस तू पक्का लव्ह गुरू. कसं ते सांगतो…

आमचे गुरुजी सांगत होते, फेसबुकवरून समाजातील मोठ्या वर्गाला कंट्रोल करता येतं. वापरकर्ते स्वतःची निर्णयक्षमता दुसर्‍याच्या हवाली करतात. फेसबुक सांगतं तेच त्यांना सत्य वाटतं. विचार शून्य मेंदू तयार होतो. अशा झुंडींना पाहिजे तसं हाकता येतं. पाहिजे तसे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडवता येतात. काही दिवसांपूर्वी ब्लू व्हेल आणि पबजीमुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या. आता फेसबुकवर पोस्ट करून आत्महत्या करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. वास्तवात आपल्याला कोणीतरी कंट्रोल करतंय. हे वापरकर्त्याना जाणवत नाही. फेसबुक, इंस्टा, ट्विटरवर मित्रांची भलीमोठी लिस्ट असते. हे सर्व मित्र आभासी असतात. ते एकमेकांंसोबत चॅटींग करतात. मात्र वास्तवात भेटल्यावर बोलतीलच याची शाश्वती नसते.

या कंपनीकडे उपभोक्त्याची आवडनिवड, विचार, त्याचा क्लास, त्यांंच्या गरजा आदींची इत्यंभूत माहिती असते. हजारो मित्र एकत्र असले तरी प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी आहे. त्यानुसार त्यांना फेसबुकवरच्या पोस्ट दिसतात. वापरकर्त्याला सभोताली त्याच्या विचाराच्या आणि त्याला आवडणार्‍याची पोस्ट दिसतात. त्यामुळे त्याचा असा समज होतो की, त्याचे विचार आणि आवडनिवड असणारे लोक अधिक आहेत. मात्र, त्यांच्या कॅटेगरीनुसार त्यांना जाहिराती अन् पोस्ट दिसतात. अमेरिकेत ट्रम्पला राष्ट्रपती कोणी केलं? इंग्लंडमध्ये ब्रेग्झिट कोणी घडून आणलं? भारतातल्या 2014 व 2019च्या सार्वजनिक उत्सवात चांगले दिवस असा शब्द गुरुजींच्या ओठात आला होता पण कशाच्या तरी विचारात गुंग होऊन तो तसाच पोटात गेला… अशी काहीबाही गुरुजींची दोन तास बडबड सुरू होती.

तू म्हणशील या घटनांचा व्हॅलेंटाईन डेशी काय संबंध? तर बघ, आमच्या आधीची पिढी प्रेम करायची. त्यांना पण मदतनीस होतेच की! राजे-राजवाड्याच्या काळात कबुतर होतीच ना. लय दूर कशाला… सलमान आणि भाग्यश्रीचा सिनेमा पहिला असेलच की. त्यातलं कबुतर जा जाफ गाणं आठवतंय? मग शाई आणि कागदाचा शोध लागल्यावर लव्हलेटर द्यायला लागले. तिथं एक घोळ व्हायचा लहान पोराजवळ पत्र द्यावं लागायचं तू सैराटफ बघितलाच असेल ना? आर्ची अन् परशा कसे लव्हलेटर पोहोच करायचे. पण आता काळ बदलला बघ. तूच हायेस आता आमचं कबुतर. तू विचार करशील एवढं पत्र वाचलं पण तिचं नाव सांगितलं नाही.फ तुला पुतीन, ट्रम्प, ब्रिटिशांची मनं कळत्यात, मग आमचं सिंगल पोरांचं मन कळणा व्हय?

हे बघ लवकर कळीव नाहीतर तुला रिटायर करल.. टिकटॉक, इन्स्टा, व्हाट्सएप हाय…

तुझा मित्र
फेबुगिरी

– प्रशांत शिंदे
 9673499181

Deshdoot
www.deshdoot.com