Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगBlog – सर्वांगसुंदर अभिनेता, जीवाभावाचा मित्र

Blog – सर्वांगसुंदर अभिनेता, जीवाभावाचा मित्र

इरफान खान आपल्याला सोडून गेला. त्याची कॅन्सरशी सुरू असणारी झुंज अपयशी ठरली. इरफान हा सर्वांगसुंदर आणि चतुरस्त्र अभिनेता. कारकिर्दीची सुरूवात होत असताना आम्ही एकत्र काम केलं. त्यानंतर इरफान यशाची एक एक पायरी चढत गेला. पण यश कधीही त्याच्या डोक्यात गेलं नाही. आम्ही खूप चांगले मित्र होतो. त्याला दिग्दर्शित करण्याची माझी खूप इच्छा होती. पण आता ते होणार नाही, याचं वैषम्य वाटत राहील.

मी इरफानसोबत ‘श्रीकांत’, ‘द ग्रेट मराठा’, ‘चंद्रकांता’, ‘स्पर्श’ या मालिका आणि ‘कमला की मौत’ या बासू चटर्जी दिग्दर्शित चित्रपटात काम केलं. श्रीकांत ही नायिका म्हणून माझी पहिलीच मालिका. इरफानचीही ती पहिलीच मालिका होती. ‘स्पर्श’ या मालिकेदरम्यान मला त्याचा अधिक सहवास लाभला. ‘श्रीकांत’च्या वेळी आम्ही खूपच नवीन होतो. पण नंतर आम्हाला या क्षेत्रातल्या चांगल्या-वाईट गोष्टींची ओळख होत गेली. इरफान आणि माझी खूप चांगली मैत्री होती. इरफानच्या जाण्याने चित्रपटक्षेत्राचं खूप मोठं नुकसान झालं असताना मी मात्र एक चांगला मित्र गमावला.

- Advertisement -

इरफान चतुरस्त्र अभिनेता होता. त्याने दूरचित्रवाणीपासून अगदी हॉलिवूडपर्यंत आपली छाप सोडली. तो आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कलाकार होता. एवढा मोठा अभिनेता माणूस म्हणून अगदी साधा, निगर्वी आणि सोपा होता. काही माणसांमध्ये अजिबात गुंतागुंत नसते. इरफान अगदी तसाच होता. माणूस इतका साधा कसा काय असू शकतो, असं वाटण्याइतका… २०१८ मध्ये त्याला कॅन्सरचं निदान झालं. त्याने लंडनमध्ये उपचार घेतले. लढवय्या बनून तो भारतात परतला. त्याचा आजार खूप गंभीर होता. त्यामुळे तो या आजाराशी फार काळ लढू शकणार नाही, याची आम्हा सगळ्यांना कल्पना होती. मात्र इरफान इतक्या लवकर आपल्याला सोडून जाईल, असं वाटलं नव्हतं.

इरफान जाण्याच्या चार दिवस आधी त्याच्या आईचं निधन झालं. आईपाठोपाठ इरफाननेही या जगाला अलविदा म्हटलं. इरफानने नैसर्गिक अभिनयाद्वारे सर्वांची मनं जिंकली. त्याने नायकाच्या प्रस्थापित कल्पनांना छेद दिला. अभिनयाची एक वेगळी पद्धत चित्रसृष्टीत रुजवली. इरफान मनापासून अभिनय करायचा. तो आमच्या पिढीतला सर्वांगसुंदर अभिनेता होता. त्याचा स्वभाव खूप गोड. तो थोडा मिश्किलच होता. फार गमतीशीर बोलायचा. त्याला विनोदाची चांगली जाण होती. चित्रिकरणादरम्यान एकत्र जमल्यावर भन्नाट किस्से सांगून तो आम्हाला हसवायचा. इरफानचा स्वभाव तसा फार बोलका नव्हता. पण एकदा का बोलायला लागला की तो एखादी मार्मिक टिपणी करून जायचा. या गमतीशीर बोलण्यामुळे कामाचा ताण कमी व्हायचा. इरफानची निरिक्षणशक्ती दांडगी होती. हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू होता. याच निरिक्षणशक्तीच्या बळावर त्याने सगळ्या भूमिकांमध्ये जीव ओतला. ‘पानसिंग तोमर’, ‘सलाम बॉम्बे’, ‘मुंबई मेरी जान’, ‘हिंदी मिडियम’, ‘अंग्रेजी मिडियम’सह इरफानच्या अभिनयाने सजलेले सर्वच चित्रपट रसिकांच्या नेहमीच स्मरणात राहतील.

मला त्याचा ‘नेमसेक’ अतिशय आवडतो. पिकू, हिंदी मीडियम हे चित्रपट तर आहेतच पण ‘नेमसेक’मध्ये त्याने अप्रतिम अभिनय केला आहे. या चित्रपटातल्या अभिनयाबद्दल त्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झालं. यामुळे आम्हा सर्वांना खूप आनंद झाला होता. ‘पानसिंग तोमर’, ‘तलवार’ अशा प्रत्येक चित्रपटात त्याने समरसून अभिनय केला. इरफान खान हाडाचा अभिनेता होता.
‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा अखेरचा चित्रपट.

आजारपणामुळे त्याला या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जाता आलं नाही. यामुळे तो हिरमुसला होता, थोडा अस्वस्थही होता. आता यातून काही होणार नाही, असं त्याला वाटत होतं. इरफानने चाहत्यांना एका क्लिपमार्फत संदेश पाठवला होता. या संदेशात इरफान म्हणतो, ‘अंग्रेजी मिडियम’ माझ्यासाठी खूप खास आहे. सगळ्या टीमने अगदी मनापासून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. म्हणूनच या चित्रपटाची प्रसिद्धीही तितकीच मनापासून करावी, अशी माझी इच्छा होती. पण माझ्या शरीरात नकोसे पाहुणे ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याशी वार्तालाप सुरू आहे. या वार्तालापातून काय निष्पन्न होतं हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल.

‘लाईफ गिव्हज यू लेमन, यू मेक लेमोनेड’ असं म्हटलं जातं. हे सगळं बोलायला, ऐकायला छान वाटतं. पण आयुष्याने प्रत्यक्षात तुमच्या हातात लिंबू दिल्यावर लिंबू सरबत तयार करताना आपली चांगलीच दमछाक होते. हे काम खूप कठीण वाटू लागतं. पण सकारात्मक विचार करण्याशिवाय आपल्या हाती दुसरं काहीही उरत नाही. आयुष्याने दिलेल्या लिंबापासून सरबत तयार करू शकता की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं. सकारात्मक विचारांनी प्रेरित होऊनच आम्ही ‘अंग्रेजी मिडियम’ तयार केला आहे. तुम्ही हा चित्रपट बघा आणि माझ्या पुनरागमनाची प्रतीक्षा करा… त्याचा हा संदेश प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून गेला.

त्याचं हे मनोगत बोलकं होतं. इरफानच्या सहजसुंदर अभिनयातून खूप काही शिकण्यासारखं होतं आणि आजच्या तरुण कलाकारांना त्याच्या भूमिकांमधून बरंच काही शिकायला मिळणार आहे. इरफानला वाचायला आवडायचं. जयपूर हे त्याचं मूळ गाव. या शहराबद्दल त्याच्या मनात आत्मियता होती. त्याला जयपूरची खूप ओढ होती. ‘श्रीकांत’च्या वेळी आम्ही दोघंही खूप लहान होतो. आमच्या कारकिर्दीला नुकतीच कुठे सुरूवात होत होती. तो नुकताच ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून बाहेर पडला होता आणि अभिनयक्षेत्रात जम बसवण्याच्या प्रयत्नात होता. ‘श्रीकांत’ ही आम्हा दोघांची पहिली मालिका सध्या दूरदर्शनवर सुरू आहे. या मालिकेत फारूख शेखही होते. इरफान आणि फारूख शेख यांची मातृभाषा हिंदी. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना मला नेहमीच थोडा ताण यायचा. हे दोघं अस्खलित ऊर्दू बोलायचे. सेटवर ते मला नेहमीच सांभाळून घ्यायचे. या दोघांमुळेच मी हिंदी मालिकांमध्ये इतकी वर्षं काम करू शकले.

मी इरफानसोबत खूप लवकर काम केलं. अभिनयाचं देणं लाभलेल्या त्याच्यासारख्या सहजसुंदर अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला आनंद आणि समाधान वाटतं. पण आताच्या काळात त्याच्यासोबत काम करता आलं असतं तर खूप मजा आली असली.
‘श्रीकांत’नंतर इरफान खूप पुढे गेला. बॉलिवूडमध्ये स्थिरावला. त्याची ख्याती हॉलिवूडपर्यंत पोहोचली. एवढा मोठा कलाकार असूनही इरफानने साधेपणा सोडला नाही. हे खरं तर खूप अवघड असतं. यश कधीही त्याच्या डोक्यात गेलं नाही. यशाची मोठी शिखरं तो पादक्रांत करत गेला. त्याच्या वागण्या-बोलण्यात एक अदब असायची. इरफानच्या या प्रवासात त्याच्या पत्नीचाही खूप मोठा वाटा राहिला आहे. हाती आलेली संधी इरफानने सोडू नये याबाबत ती कायम आग्रही असायची. उगाचच पुढे पुढे करणं, स्वत:ची प्रसिद्धी करणं त्याच्या स्वभावात नव्हतं. स्वीय सचिवाची नेमणूक करणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम मिळवण्यासाठी प्रयत्न करणं असं काही त्याने केलं नाही. इरफानबद्दलची एक आठवण सांगायची तर मी त्याला एक कथा ऐकवली होती. मी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आल्याचं कळल्यानंतर त्याला खूप गंमत वाटली होती. त्याला दिग्दर्शित करायला मला खूप आवडलं असतं. आपण हा चित्रपट करू या, असंही तो म्हणाला होता. पण दुर्दैवाने ते आता होणार नाही. ही संधी मी कायमची गमावली आहे. मनाच्या एका कोपर्‍यात नेहमीच ही बोच राहणार आहे.

इरफानसोबत चांगली मैत्री असल्यामुळे आमचा सतत संपर्क असायचा. गेल्या आठवड्यातही मी त्याच्याशी बोलले होते. मित्राचा एक भावनिक पाठिंबा असतो. तसाच इरफानचाही असायचा. नवं काही तरी हाती घेतल्यावर मित्रमंडळी एकमेकांना सांगतात. तसंच आम्हीही सांगायचो. एकमेकांसोबतच बरंच काही शेअर करायचो. ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्यावर त्याने मला फोन केला होता. ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर आम्ही त्याला ‘अवर पद्मश्री फ्रेंड’ असं म्हणायचो. असाच आमचा वार्तालाप सुरू असायचा. कॅन्सर झाल्यानंतरही तो खूप आशावादी होता. त्याला कॅन्सरग्रस्तांसाठी कामही करायचं होतं. इरफानचं हे स्वप्नं अपूर्ण राहिलं. इरफान खूप लवकर गेला. तो अजून बरंच काही करू शकला असता. अनेक दर्जेदार चित्रपट त्याची वाट बघत होते. इरफान चित्रपटसृष्टीला खूप काही देऊन गेला असता. आम्ही आमचा खूप चांगला मित्र गमावला आहेच पण इरफान चित्रपटसृष्टीलाही पोरकं करून गेला आहे…

– मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या