Blog : नव्या शक्तीसाठी गावांना हवीय ‘तंटामुक्ती’
Featured

Blog : नव्या शक्तीसाठी गावांना हवीय ‘तंटामुक्ती’

Sarvmat Digital

गावातील तंटे गावातच मिटवून गावाची यासाठी खर्ची होणारी ऊर्जा वाचवून गावाला समृद्ध बनविण्यासाठी 2006 मध्ये तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी तंटामुक्त गाव मोहीम सुरु केली होती. या मोहिमेद्वारे अनेक गावे तंटामुक्त झाली. आता मात्र या मोहिमेलाच मरगळ आली आहे. परिणामी तंटे वाढून पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. गावांच्या पार्यायाने देशाच्या भल्यासाठी ही मोहीम नव्या निर्धाराने पुन्हा एकदा राबविण्याची गरज आहे.

गावे सुधारली तर देश सुधारेल हे ओळखलेल्या महात्मा गांधी यांच्या नावाने 2006 मध्ये तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम सुरु केली. खेड्यांच्या विकासासाठी काय हवे हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळेच 2000 साली सुरु केलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या यशानंतर 2006 मध्ये तंटामुक्त गाव मोहीम सुरु केली.

महाराष्ट्रात गाव पातळीवर घर, रस्ते, शेताचे बांध यावरुन तसेच अन्य किरकोळ कारणांवरुनही वादावादी होते व त्याचे पर्यवसान मोठ्या वादात होवून हे वाद पोलीस प्रशासन व न्यायालयात जावून अडकतात. परिणामी लोकांच्या वेळेचा अपव्यय व आर्थिक नुकसानही होते. गावातील या किरकोळ वादांवर गावातच तोडगा निघून वाद मिटले तर पोलीस व न्यायप्रणालीवरील बोजा कमी तर होतोच त्याचबरोबर गावात शांतता नांदते व पर्यायाने गाव समृद्धीकडे मार्गक्रमण करते.

किरकोळ कारणावरुन वादात दोन्ही बाजूंनी समजुतीची भूमिका घेतली जात नाही. दोन्ही बाजूंनी माघार न घेणे प्रतिष्ठेचे बनते. राजकीय उट्टे काढण्यासाठी काही लोक चुकीचे सल्ले देवून आगीत तेल ओतण्याची भूमिकाही बजावत असतात. दिवंगत आर. आर. पाटील यांनी गावातील ग्रामसभेने तंटामुक्त गाव समिती स्थापन करुन अध्यक्ष व सदस्यांची निवड करायची व या समितीने गावातील अस्तित्वात असलेले तंटे व नव्याने निर्माण झालेले तंटे गावातच मिटवायचे. गावात सण, यात्रा, उत्सव शांततेत होण्यासाठी एकोपा राखायचा. किरकोळ तंटे झालेच नाहीत तर मोठे वाद होणारच नाहीत व पर्यायाने गावात एकोपा आपोआप निर्माण होईल हा यामागे हेतू होत्या. अनेक वर्षे ही मोहीम यशस्वीरित्या राबवून अनेक गावे तंटामुक्त झालीही. अनेक गावांनी तंटामुक्त गाव बनून दाखविले.

नगर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये आघाडीवर असलेल्या नेवासा तालुक्यात तर 2020 च्या पहिल्या 75 दिवसातच 160 दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजे सरसरासरी दररोज किमान दोन दखलपात्र गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यांपैकी अनेक गुन्ह्यांचे कारण हे या आधीचे अदखलपात्र गुन्हे किंवा पूर्वीचे झालेले किरकोळ वाद हेच असल्याचे दिसते. शेकडोंच्या संख्येने गुन्ह्यांचा तपास करणे पोलीस बळाची मर्यादा लक्षात घेता सोपी गोष्ट नाही.

अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या तर खूप मोठी आहे. तरीही पोलीस ठाण्यात आलेल्या सर्वच वादांचे गुन्हे दाखल होतातच असे नाही. हे वाद मिटवणे पोलीस यंत्रणेला सोपे नसते. आजही अनेक गावात मोठ्या संख्येने तंटे आहेत. काही ठिकाणी पोलिसात गुन्हे दाखल आहेत तर काही न्यायालयात दावा चालू असतानाही तंटे होतात. गावातल्या गावातच किरकोळ वाद मिटल्यास त्याचे रुपांतर मोठ्या वादात होणारच नाही. परिणामी पोलीस प्रशासन व न्याय व्यवस्थेवर ताणही येणार नाही. गावात शांतता निर्माण होईल.

आज तंटामुक्त गावाची संकल्पना त्यात काही त्रुटी असल्यास दूर करुन नव्या उत्साहाने व गांभीर्याने राबविण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. गंभीर गुन्ह्यांसाठी पोलीस यंत्रणा आहेच. त्यात तंटामुक्त समित्यांनी हस्तक्षेप करु नये. मात्र किरकोळ तंटे तंटामुक्त समित्यांमार्फतच मिटवले जायला हवेत. त्यासाठी गावात राजकीय हेवेदावे नसलेल्या व प्रामाणिक इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तींना निवडायला हवे. गावात सर्वांशी चांगले संबंध असलेल्या प्रतिष्ठीत व्यक्ती असतातच. तंटामुक्ती समिती नसली तरी अनेक ठिकाणी अशा व्यक्तींच्या शब्दाला मान दिला जातो. अशा व्यक्तींची निवड यासाठी करता येवू शकते. तंटामुक्ती अध्यक्ष, समिती सदस्य यांची ग्रामसभेने निवड करताना कोणत्या गटाचे किती याचा विचारच करायला नको.

गावातील तंट्यामधून राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न करणारे लोक या समितीमध्ये असू नयेत. गावातील पोलीस पाटील व तंटामुक्त समित्यांनी गावातील वादी-प्रतिवादींचे म्हणने ऐकून वाद सोडवले पाहिजेत. प्रसंगी गावातील वकीलांचे, पोलीस अधिकार्‍यांचेही सहकार्य घ्यायला हवे. ग्रामीण भागाला समृद्ध करायचे असेल तर गावातील लोक मनाने एकत्र असले पाहिजेत. किरकोळ वाद झाले तरी ते सामोपचाराने मिटविण्याची यंत्रणा यामुळे निर्माण होईल.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम ही क्रांतीकारी मोहीम आहे. तिची गरज व महत्व आजही कायम आहे. मरगळ आलेली ही मोहीम पुन्हा एकदा मोठ्या धाडसाने राबविण्यास सुरुवात करायला हवी. संपूर्ण राज्यातच ही मोहीम हवी. किमान प्रत्येक गावाने आपल्या गावात वाद होऊ नयेत म्हणून ही मोहीम निर्धारपूर्वक राबविली तर यात गावाचेच हित होईल. देशाच्या सुधारणेचीच ही प्रक्रिया असेल.

-अशोक पटारे
9404251840

Deshdoot
www.deshdoot.com