Blog : एड्स ते करोना
Featured

Blog : एड्स ते करोना

Sarvmat Digital

माणसांतील विकृती मानव जातीलाच किती घातक असते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या चालू असलेल्या करोना या रोगाबद्दल म्हणता येईल. विज्ञान जसजसे प्रगत होत आहे, तसतसा विविध नवीन रोगांचा जन्म आणि जीवघेणा फैलावही मोठ्या प्रमाणावर होत आहे. पस्तीस वर्षांपूर्वी ‘एड्स’ या भीषण रोगाला सुरुवात झाली आणि हा रोग जागतिक स्तरावर एक भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करून बसला. अजूनही या रोगावर खात्रीशीर असा उपाय सापडला नाही. तरीही मोठ्या प्रमाणावरील जनजागृतीने हा रोग नियंत्रणात मात्र आणला गेला.

हा साथीचा रोग नसल्यामुळे नियंत्रण आणणे शक्य झाले. असे म्हटले गेले, की एड्स हा आफ्रिकेतील माकडाच्या एका जातीतून माणसाच्या शरीरात प्रवेश केला. त्या माकडांत नैसर्गिकरीत्याच एड्सचे विषाणू असतात. त्यांच्याशी केलेल्या विकृत शारीरिक संबंधातून एड्सने मानवी शरीरात प्रवेश केला आणि तो क्रमाक्रमाने फैलावत गेला.

पाश्चात्त्य देशांतील विकृतीने मानवी जीवन एकदम दूषित करून टाकले आहे. शिवाय त्याला विज्ञानाचे विविध नवनवे शोध जे माणसाच्या हव्यासापोटी लावले गेले, त्यातूनही अनेक महाभयंकर रोगांची उत्पत्ती झाली. आता नव्याने ‘करोना’ नावाचा रोग जगात थैमान घालत आहे. चीनने ही देणगी जगाला दिली. असे म्हटले गेले, की चीनमधील एका महिलेने ‘वटवाघूळ’ या पक्ष्याचे मांस खाल्ले आणि त्याद्वारे हा रोग मानवांत फैलावला गेला.

यात तथ्य किती हा भाग वेगळा. शिवाय नवनवीन जैवसंशोधनातूनही या रोगाची उत्पत्ती झाली असे सांगितले गेले. दोन्ही बाबी या विकृतीच्या संज्ञेतच मोडतात. कोणतीही नवनिर्मिती मानवी जीवन सुखकर व्हावी यासाठी व्हायला हवी; परंतु विज्ञानाचे शोध विकृत आनंदासाठी जर लावले जात असतील तर पुढे चालून मानवी जीवन केव्हाही धोक्यात येऊ शकते. करोना या रोगाने तसा धोक्याचा कंदील दाखविला आहे. या रोगावर अद्याप खात्रीशीर असा उपाय सापडला नाही किंवा त्यासंदर्भात प्रतिबंधात्मक अशी लसही सापडली नाही. भारतात या रोगाचा फैलाव झाला नाही ही चांगली बाब म्हणावी लागेल ! शिवाय भारताने तो होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या आहेत, हे कोणाला खरेही वाटणार नाही.

भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात पटकी (कॉलरा), देवी आणि प्लेग या रोगांनी कहर केला होता. साथ आली की शेकडो माणसे पटापटा मरायची. स्वातंत्र्यानंतर या तिन्ही रोगांवर पूर्णपणे नियंत्रणच मिळविले नव्हे तर हे रोग नाहीसे झाले आहेत. चीनसारख्या प्रागतिक देशांनी भारताकडून बरेच काही शिकण्यासाखेे आहे. करोना हा साथीचा रोग नाही; परंतु संसर्गजन्य मात्र जरूर आहे. अशा रोगांवर आयुर्वेदिक उपचार असू शकतात. त्या संशोधनाला पुढे आणले पाहिजे.

भारतीय ऋषिमुनींनी जगाला बहुमोल भांडार उघडे करून ठेवले आहे. त्या ज्ञानाचा उपयोग करोना किंवा अन्य रोगांवरील उपचारासाठी करता येऊ शकेल. शिवाय भारतीय जीवनपद्धतीनुसार आयुष्य जगले तर मानवी जीवन सुखी समृद्ध होईल. योग, आयुर्वेद आणि अध्यात्म यांची सांगड घालून मानवाने वाटचाल केली तर करोनाच काय अन्य रोगही नियंत्रणात येऊ शकतील. पाश्चात्त्य ‘विकृती’ नव्हे तर प्राचीन भारतीय परंपरेची ‘स्वीकृती’च अशा अनेक समस्यांवरील उपाय आहे.

– प्र. के. कुलकर्णी
  7448177995

Deshdoot
www.deshdoot.com