संगमनेर, नेवासा भाजपा तालुकाध्यक्ष निवडीचा चेंडू जिल्हा कोअर कमेटीकडे
Featured

संगमनेर, नेवासा भाजपा तालुकाध्यक्ष निवडीचा चेंडू जिल्हा कोअर कमेटीकडे

Dhananjay Shinde

संगमनेर, नेवासा (प्रतिनिधी)-नगर जिल्ह्यातील भाजपाचा संघटनात्मक निवडीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार शनिवारी कर्जत तालुकाध्यक्षांची निवड झाली. काल रविवारी श्रीगोंद्याच्या तालुकाध्यक्षाच्या निवडीवर एकमत झाले, पण संगमनेर तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि नेवासा तालुकाध्यक्ष पदांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने कुणाच्याही नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे या निवडीचा निर्णय जिल्हा कोअर कमेटीकडे सोपविण्यात आला आहे. याचा निर्णय 26 डिसेंबर रोजी होेण्याची शक्यता आहे. संगमनेर शहराध्यक्ष निवडणुकीत 23 उमेदवार इच्छुक आहेत. शेवटच्या टप्प्यात चौघांनी माघार घेतली. पण संख्या जास्त असल्याने एकमत न झाल्याने जिल्ह्यातील कोअर कमेटी याबाबतचा निर्णय घेणार आहे.

शहराध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदारांमध्ये शिरीष मुळे, राजेंद्र सांगळे, किशोर गुप्ता, संजय नाकिल, रोहित चौधरी, शिवकुमार भंगिरे, सुनील खरे, राहुल भोईर, निरज दिक्षीत, डॉ. आरोटे यांचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी म्हणून शिवाजीराव गोंदकर तर जिल्हा भाजपचे प्रतिनिधी म्हणून नितीन कापसे यांनी काम पाहिले.

तालुका अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 54 इच्छुक आहेत. तालुका अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदारांमध्ये डॉ. अशोकराव इथापे, डॉ. अरुणराव इथापे, अ‍ॅड. रामदास शेजूळ, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, सुधाकर गुंजाळ, भरत फटांगरे, नानासाहेब खुळे, महेश जगताप, मधुकर वाळे, वैभव लांडगे, रामनाथ दिघे, केशव दवंगे, नेताजी घुले यांचा समावेश आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी काम पाहिले तर जिल्हा भाजपचे प्रतिनिधी म्हणून सचिन तांबे यांनी काम पाहिले. तालुका अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमत झाले नाही. निर्णय जिल्ह्याच्या कोअर कमिटीकडे सोपविण्यात आला.
नेवासा तालुकाध्यक्ष पदासाठी 17 जण इच्छुक आहेत. येथेही एकमत झाले नाही. दावेदारांमध्ये ज्ञानेश्‍वर पेचे, नितीन दिनकर, अंकुश काळे व अन्य काही जणांचा समावेश आहे. नेवासा तालुका अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही एकमत झाले नाही. त्यामुळे हा निर्णय जिल्ह्याच्या कोअर कमिटीकडे सोपविण्यात आला.

श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी संदीप नागवडे यांची एकमताने निवड करण्यात आली . तत्पूर्वी शनिवारी कर्जत तालुकाध्यक्षपदी सुनील गावडे यांची निवड करण्यात आलेली आहे. श्रीरामपूर, राहुरी, अकोले व अन्य तालुकाध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com